
धारावी प्रकल्प अदाणीच्या घशात घालण्याचा प्रयत्न
धारावी, ता. १२ (बातमीदार) : धारावी पुनर्विकास प्रकल्प गेल्या १९ वर्षांपासून रखडला आहे. आताच्या महाराष्ट्र शासनाने धारावी विकासाचा प्रकल्प अदाणी कंपनीला दिला आहे. त्याविरोधात ‘धारावी बचाव आंदोलन’ आक्रमक झाले आहे. त्यांनी पत्रकार परिषदेतून सरकारवर टीका केली आहे.
धारावीचा विकास गेल्या ५० वर्षांत झाला नाही. तो आता पाच-सहा वर्षांत होईल यावर धारावीतील नागरिकांचा मुळीच भरवसा नाही. उलट पुनर्विकासाच्या नावावर धारावीतील गोरगरीब श्रमिक, कष्टकरी, छोटे व्यापारी, उद्योजक या सर्वांना धारावीतून बाहेर घालवण्याचा सत्ताधारी भाजपचा डाव आहे, असा आरोप आंदोलनाच्या नेत्यांनी केला आहे. धारावीच्या पुनर्विकासासाठी स्थानिक जनतेला विश्वासात घेतल्याशिवाय पुनर्विकासाची एकही वीट रचू देणार नसल्याचे जाहीर करत सर्वपक्षीय कृती समितीने आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला आहे. धारावी बचाव आंदोलनाचे नेते ॲड. राजेंद्र कोरडे, माजी आमदार बाबुराव माने, अनिल कासारे, शिवसेना नेते विठ्ठल पवार आदींनी या पत्रकार परिषदेला संबोधित केले.