
शिक्षक परिषदेचे वार्षिक अधिवेशन
मुंबई, ता. १२ (बातमीदार) : दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे वार्षिक अधिवेशन पार पडले. अधिवेशनाचे अध्यक्षस्थान नागपूर विभागाचे माजी आमदार नागो पुंडलिक गाणार यांनी भूषविले; तर याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पुणे विभागाचे माजी शिक्षक आमदार भगवानराव साळुंखे, कोकण विभागाचे नवनिर्वाचित शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहित्यिक कविवर्य अशोक नायगावकर आणि अशोक बागवे उपस्थित होते. याप्रसंगी बारा गुणवंत शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. तसेच निबंध स्पर्धेत यश प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचाही बक्षीस देऊन गौरव करण्यात आला. शिक्षक परिषदेचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी शिक्षक परिषदेची निर्मिती व इतिहास सांगितला आणि कार्यक्रमाची सांगता झाली.
हे ठराव झाले मान्य
शिक्षक परिषदेच्या अधिवेशनात २००५ नंतर नियुक्ती झालेल्या शिक्षकांसाठी जुनी पेंशन योजना लागू करणे, कॅशलेस मेडिक्लेम लागू करणे, १ तारखेला वेतन देण्याच्या निर्णयाची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे, रात्रशाळांचे प्रश्न मार्गी लावणे, तंत्र शिक्षकांचे प्रश्न, महिलांना बालसंगोपन रजा केंद्र सरकारप्रमाणे मंजूर करणे, ६ ते ८ वर्गांना शिकवणाऱ्या पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतनश्रेणी लागू करणे, अश्वासित प्रगती योजना लागू करावी अशा प्रकारचे ११ ठराव मंजूर करण्यात आले. या ठरावांबाबत आजी-माजी शिक्षक आमदारांनी पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.