कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी
कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी

कोकण ज्ञानपीठ महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याची मागणी

sakal_logo
By

मुंबई, ता. १२ (बातमीदार) : कोकण ज्ञानपीठ अभियांत्रिकी महाविद्यालयातील अध्यापकांचे गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले प्रश्न त्वरित निकाली काढावेत, अशी मागणी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांनी महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे केली आहे. सोळा महिन्यांचे प्रलंबित वेतन त्वरित देण्यात यावे, ३५ महिन्यांचा भविष्य निर्वाह निधी जो अद्यापपर्यंत जमा केलेला नाही तो त्वरित जमा करावा, अध्यापकांना अतिरिक्त कामाचा मोबदला द्यावा, वाढीव महागाई भत्ता त्वरित देण्यात यावा, अशा मागण्या धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेने आपल्या पत्रात केल्या आहेत.

अमली पदार्थ विक्रीच्‍या ठिकाणांवर कारवाई
धारावी, ता. १२ (बातमीदार) : धारावीत अमली पदार्थ विक्रीचा व्यवसाय वाढीस लागल्याने धारावीतील रहिवाशांच्या चिंता; तर पोलिसांची डोकेदुखी वाढली होती. याविरोधात धारावी पोलिस सक्रिय झाले आहेत. त्‍यांनी नुकतीच धारावीतील पिवळा बंगला येथील राजीव गांधीनगर, कुंभारवाडा, सुभाषनगर आदी ठिकाणी असलेल्या अमली पदार्थ विक्रीच्‍या केंद्रांवर कारवाई केली. ही कारवाई पालिकेच्या ग, उत्तर विभाग व धारावी पोलिसांनी संयुक्तपणे केली. या संदर्भात धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विजय कांदळगावकर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, मी जोपर्यंत या ठिकाणी कर्तव्य बजावीत आहे, तोपर्यंत धारावीला नशामुक्त करणार. यात काहीही झाले, तरी तडजोड करणार नाही. याविरोधात अधिक कठोर कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत राहणार असल्‍याचेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. या कारवाईत धारावी पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक वामन ठाकरे, पोलिस उपनिरीक्षक अंकुश जाधव, कामशेट्टे पथकाने सहभाग घेतला होता. पालिकेच्या ग, उत्तर विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत सपकाळे यांचे सहकार्य लाभले होते.

मराठी भाषा दिनानिमित्त खुली लेख स्पर्धा
मुंबई, ता. १२ (बातमीदार) ः कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईच्या वतीने ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यंदा वृत्तपत्र चळवळीचा अमृतमहोत्सव साजरा करणाऱ्या मराठी वृत्तपत्र लेखक संघाच्या वतीने ‘मराठी भाषेचे भविष्य आज आणि उद्या’, ‘जागतिकीकरण आणि मराठी भाषा’ या विषयावर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृती खुली लेख स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी शब्दमर्यादा १२०० असून इच्छुकांनी युनिकोड मराठीमध्ये टाईप करून लेख rajandesai759@gmail.com या मेलवर २० फेब्रुवारीपर्यंत पाठवावेत, पारितोषिक वितरण समारंभ रविवारी (ता. २६) धुरू हॉल, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर येथे होईल, असे सांगण्यात आले आहे.

मासिक पाळीसंदर्भात माहिती सत्र
गोरेगाव, ता. १२ (बातमीदार) : आरे कॉलनी युनिट ३१ येथील असंघटित महिला कामगारांना भाकर फाऊंडेशनचे संस्थापक दीपक सोनावणे यांनी मासिक पाळी, सॅनिटरी पॅड व आरोग्याची काळजी कशी घ्यावी, रुढी–परंपरा व गैरसमज तसेच सरकारी योजनांविषयी मार्गदर्शन केले. त्‍यानंतर सर्व महिलांना मोफत सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. या वेळी सामाजिक कार्यकर्त्या रंजना जायभाये, प्रशांत चव्हाण, दीपक भालेराव व मोठ्या प्रमाणात महिला उपस्थित होत्या.