
मानखुर्दमध्ये अनोळखी पुरुषाचा मृत्यू
मानखुर्द, ता. १२ (बातमीदार) ः घाटकोपर मानखुर्द जोडरस्त्यावरील उड्डाणपुलाखाली करबला हॉलसमोर शनिवारी सायंकाळी (ता. ११) अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत आढळला होता. मानखुर्द पोलिसांनी त्याला उपचारासाठी गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयात नेले. त्या ठिकाणी दाखल करण्यापूर्वीच तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. त्यानंतर मृतदेह उत्तरिय तपासणीसाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात पाठवून देण्यात आला. मानखुर्द पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे. अभियंता सुधीर चव्हाण यांना शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या सुमारास घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलाखाली अनोळखी पुरुष बेशुद्धावस्थेत आढळला. त्यांनी मानखुर्द पोलिसांशी संपर्क साधून याविषयी तत्काळ माहिती दिली. मानखुर्द पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेत त्या व्यक्तीला त्वरित उपचारासाठी शताब्दी रुग्णालयात नेले; परंतु तेथे दाखल करण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. मानखुर्द पोलिस त्या व्यक्तीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहेत.