
नेरळमधील वादातीत जोत्यावरील घरपट्टी रद्द
नेरळ, ता. १२ (बातमीदार) ः नेरळ विकास संकुल प्राधिकरणाच्या नियोजित जागेत जोत्याचे अनधिकृत बांधकाम असताना नेरळ ग्रामपंचायतीने घरपट्टी आकारणी केली होती. तर याबाबत ग्रामस्थ संदीप म्हसकर यांनी हरकत घेतल्यावर संबंधित जागेवर कोणत्याही प्रकारचे घराचे बांधकाम नसल्याचे ग्रामपंचायतीच्या लक्षात आले. त्यानंतर वादातीत जोत्यावरील घरपट्टी रद्द कारवाई केली आहे. त्यामुळे आता जोत्याच्या अनधिकृत कामावर कधी कारवाई होणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
नेरळ ग्रामपंचायतीतील मोहाचीवाडी येथे प्राधिकरणाच्या माध्यमातून विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. ४० फूटाचा रस्ता परिसरात नियोजित केला आहे. याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रासाठी जागा आरक्षित केली आहे. परंतु प्राधिकारणाने ज्या ठिकाणी रस्ता अधोरेखित केला आहे, त्या ठिकाणी अतिक्रमण झाले असून सिमेंटचा पक्का स्वरूपात घराचा जोता बांधण्यात आला आहे. नेरळ ग्रामपंचायतीने अनधिकृतपणे होणार्या बांधकामावर कारवाई करण्याऐवजी घरपट्टी आकारणी.
१४ ऑक्टोबर २०२० मध्ये सुनंदा रवींद्र पोपेटे यांनी सर्वे नं २५३ मधील अर्धा गुंठे जागा विकत घेतली असून त्यावर घरपट्टी आकारणीसाठी अर्ज केला होता. मात्र त्यावेळी ७/१२ उतारा व मोजणी नकाशा आणल्याशिवाय ‘अर्ज मासिक सभेवर’ असा शेरा टाकण्यात आला. त्यानंतर पोपेटे यांनी कोणतीही कागदपत्रे सादर केली नाही, तरी घरपट्टी आकारण्यात आली. याबाबत नेरळ येथील ग्रामस्थ संदीप म्हसकर यांनी आक्षेप घेतला.
ग्रामपंचायतीने पोपेटे यांना नोटीस काढून ७/१२ घेऊन ग्रामपंचायत कार्यालयात सादर करावा अन्यथा घरपट्टी रद्द केली जाईल, असा इशारा दिला आहे. अखेर ७ फेब्रुवारीला घरपट्टी रद्द करण्यात आली. मात्र जोत्याचे काम जैसे थे असल्याने त्यावर कारवाई कधी होणार, याकडे नागरिकांचे लक्ष आहे. याबाबत नेरळ ग्रामपंचायतीकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, संपर्क होऊ शकला नाही.
ग्रामपंचायतीने सुरवातीला अतिक्रमण होताना लक्ष दिले नाही. मात्र तक्रार केल्यावर संबंधित पोपेटे यांच्या प्राधिकरणाच्या रस्त्यात असलेल्या अनधिकृत घरावरील घरपट्टी रद्द केली आहे. मात्र जोत्याचे बांधकाम तसेच आहे, ते कधी आणि कोण हटवणार, असा प्रश्न आहे.
- संदीप म्हसकर, ग्रामस्थ, नेरळ
नेरळ ः