
कचऱ्यात अडकलेल्या स्कायवॉकची अखेर स्वच्छता
वडाळा, ता. १२ (बातमीदार) ः नागरिकांच्या सोयीसाठी कोट्यवधी रुपये खर्चून वडाळ्यात उभारण्यात आलेला स्कायवॉक गेल्या सहा महिन्यांपासून कचऱ्याच्या विळख्यात सापडला होता. परिणामी प्रवाशांना येथून ये-जा करणे गैरसोयीचे झाले होते. या समस्येची दखल घेऊन रोजी दै. ‘सकाळ’ने ‘वडाळ्यात स्कायवॉक कचऱ्यात’ या शीर्षकाखाली मंगळवारी (ता. ७) वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर पालिकेला जाग आली असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रविवारी (ता. १२) स्कायवॉकवर साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान स्कायवॉकवरील स्वच्छता पाहून प्रवाशांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
वडाळा पूर्व रेल्वे स्थानकाच्या पादचारी पुलाला जोडून एमएमआरडीएने कोट्यवधी रुपये खर्च करून अंदाजे ८०० मीटरचा स्कायवॉक बांधला. ज्यामुळे वडाळा पूर्व विभागातील हजारो पादचाऱ्यांना याचा फायदा झाला. मुंबई शहरातील सर्वात जास्त रहदारी असणाऱ्या स्कायवॉकमध्ये याची गणना होते; मात्र त्याच्या देखभालीकडे प्रशासनाचे दर्लक्ष होत आहे. या स्कायवॉकवर कचरापेट्या नसल्यामुळे कुठेही कचरा टाकला जात आहे. या समस्येची दखल घेऊन ‘सकाळ’ने ‘वडाळ्यात स्कायवॉक कचऱ्यात’ या शीर्षकाखाली वृत्त प्रसिद्ध केले होते. पालिकेला अखेर जाग आली असून पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी स्कायवॉकवर साफसफाई करण्यास सुरुवात केली आहे.