महामार्गासह वासिंद बाजारपेठेत चक्काजाम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महामार्गासह वासिंद बाजारपेठेत चक्काजाम
महामार्गासह वासिंद बाजारपेठेत चक्काजाम

महामार्गासह वासिंद बाजारपेठेत चक्काजाम

sakal_logo
By

आसनगाव, ता. १२ (बातमीदार) : मुंबई-नाशिक महामार्गावर आसनगावजवळील सर्व्हिस रोडवर रविवारी (ता. १२) कंटेनरसह ट्रक बंद पडल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात काही वाहनचालकांनी वासिंद बाजारपेठेतील जुना आग्रा रोडवर वाहन वळवल्याने त्याचा फटका वासिंदकरांना बसला.
आसनगाव येथे रेल्वे पुलाचे, हॉटेल परिवार गार्डन आणि वासिंदजवळील हॉटेल चक्रधारी येथे नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. आसनगाव औद्योगिक वसाहतीला जोडण्यासाठी महामार्गावर उड्डाणपुलाची आवश्यकता होती; तर वासिंद गावात जाण्यासाठीदेखील उड्डाणपुलाची आवश्यकता होती. सध्या मुंबई-नाशिक महामार्गाचे रुंदीकरणाचेदेखील काम सुरू आहे. वासिंद, आसनगाव परिसरातील कित्येक नागरिकांना याच ठिकाणी महामार्ग ओलांडताना आपला जीव गमवावा लागला; तर कित्येक जणांना गंभीर दुखापत झाली. त्यामुळे नागरिकांची मागणी लक्षात घेऊन नॅशनल हायवे ॲथॉरिटीने गावात जाण्यासाठी नवीन उड्डाणपुलाचे काम सुरू केले आहे.
रविवार असल्याने मुंबई, ठाण्यातील चाकरमानी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी घराबाहेर पडतात; परंतु मुंबई-नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडीतून वाट काढताना त्यांचा चांगलाच हिरमोड होतो. त्यात रविवारी (ता. १२) सकाळी दहाच्या सुमारास आसनगाव सर्व्हिस रोडवर कंटेनरसह १२ चाकी मोठा ट्रॅक बंद पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात झालेल्या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनचालकांनी वासिंद जुना आग्रा रोडवरून प्रवास करण्याचा प्रयत्न केला; परंतु वासिंद बाजारपेठेतील अरुंद रस्त्यांमुळे वासिंद शहरातदेखील मोठ्या प्रमाणात वाहनकोंडी झाली. त्याचा नाहक फटका व्यापारी, ग्राहक, महिला, वृद्ध आणि लहान मुलांना सहन करावा लागला.