
चांदिवलीच्या डीपी रोडसाठी रहिवाशी आक्रमक
घाटकोपर, ता. १२ (बातमीदार) ः चांदिवलीतील रखडलेला डीपी रोड, रस्त्यावरील अतिक्रमण, वाहतूक कोंडी यासाठी रविवारी (ता. १२) चांदिवलीतील सिटीझन वेल्फेअर असोसिएशनच्या माध्यमातून शेकडो रहिवाशांच्या उपस्थितीत आंदोलन करण्यात आले. राज्य शासन व महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी चांदिवलीच्या ९० फूट रोडवर शांततापूर्ण आंदोलन करण्यात आले.
या वेळी चांदिवलीतील रहिवाशांनी आपल्या समस्या व्यक्त केल्या. चांदिवली सिटीझन वेल्फेअर असोसिएशनचे सदस्य मनदीप सिंग यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, चांदिवलीचा ९० फूट रखडलेला डीपी रस्ता, वाहतूक कोंडी, रस्त्यावरील अतिक्रमण आणि रहदारीचा चांगले रस्ते व पादचाऱ्यांना अनुकूल पदपथ या मागण्यांसाठी सिटीझन वेल्फेअर असोसिएशनने वारंवार महापालिकेकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नाईलाजाने चांदिवलीच्या रहिवाशांनी आंदोलन केले. आगामी काळात विभागातील सर्व राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांना यात सहभाग होण्याची विनंती करण्यात येईल, असेही सिंग यांनी सांगितले.