
बनावट इंजेक्शन मृत्यूप्रकरणी तीन आरोपी अटकेत
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १२ : सैफी हॉस्पिटलमध्ये बनावट इंजेक्शनमुळे झालेल्या मृत्यूप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली. तिन्ही संशयित आरोपी औषध कंपन्यांचे मालक असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑक्टोबर २०२२ मध्ये बनावट इंजेक्शन दिल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी विवेक कांबळी (वय ५५) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी ७ जानेवारी २०२३ रोजी पोलिसांनी १२ इसमांविरोधात गुन्हा दाखल केला होता. व्ही. पी. रोड पोलिसांनी दोन औषध कंपन्यांच्या तीन मालकांना अटक केली आहे. या आरोपीत जय माँ अंबे मेडिकोजचे अमित बन्सल (वय ४७), देश दीपक सुरी (वय ५२) आणि कान्हा फार्माचे प्रदीप अग्रवाल (३६) यांना गुरुवारी (ता. ९) दिल्लीत अटक करण्यात आली. न्यायालयाने तिघांना जामीन मंजूर केला असून बन्सल आणि सुरी यांना १३ फेब्रुवारी रोजी गिरगाव न्यायालयात हजर राहण्यास सांगितले. आरोपी प्रदीप अग्रवाल शनिवारी न्यायालयात हजर झाले आणि त्यांना व्ही. पी. रोड पोलिस कोठडीत पाठवण्यात आले.