१४ गावांत ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेचे उदघाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

१४ गावांत ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेचे उदघाटन
१४ गावांत ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेचे उदघाटन

१४ गावांत ठाकरे गटाच्या शिवसेना शाखेचे उदघाटन

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १३ : १४ गावांतील दहिसर येथील शिवसेनेची शाखा महसूल विभागाने जमीनदोस्त केली होती. दहिसर येथील शाखा तोडण्यात आल्यानंतर ठाकरे गटात नाराजीचे वातावरण होते. शाखा तोडण्यात आल्यानंतर हार न मानता ठाकरे गटाने तेवढ्याच उमेदीने पिंपरी गावात नवी शिवसेना शाखा सुरू केली. उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे लोकसभा संपर्क प्रमुख तथा माजी आमदार सुभाष भोईर यांच्या हस्ते या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी पक्षातील काही कार्यकर्त्यांना भोईर यांच्या हस्ते पद वाटपही करण्यात आले.

राज्यात फडणवीस व शिंदे यांचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेच्या शाखेवर शिंदे गटाकडून ताबा मिळविण्यास सुरुवात झाली. अनधिकृतरित्या उभारल्या गेलेल्या अनेक शाखा महसूल विभागाकडून जमीनदोस्त करण्यात आल्या. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दिवंगत आनंद दिघे यांनी अनेकदा भेट दिलेली दहिसर येथील शिवसेनेची शाखा तोडण्यात आल्याने ही गोष्ट ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागली होती. त्यानंतर खचून न जाता ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आपले काम हे सुरूच ठेवले होते. तीन महिन्यांतच पिंपरी गावात नवी शिवसेनेची शाखा शिवसैनिकांनी उभी केली आहे. माजी आमदार भोईर यांच्या हस्ते या शाखेचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ, उपजिल्हाप्रमुख प्रकाश म्हात्रे, कविता गावंड, जिल्हा परिषद सदस्य रमेश पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
जबाबदारीत वाढ
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना माजी आमदार भोईर म्हणाले, १४ गावांत जरी दोन शिवसेना झाल्या असल्या तरी मूळ शिवसेना उद्धव बाळासाहेबांची शिवसेना आहे आणि तशाच प्रकारची राहील, हा विश्वास येथील उपस्थित कार्यकर्त्यांच्या माध्यमातून दिसून येतो. पदाधिकाऱ्यांना पद वाटप करण्यात आले असून त्यांच्या जबाबदाऱ्या आता वाढल्या आहेत. गावागावांत शिवसेना वाढविण्याचे काम हे पदाधिकारी करतील यात दुमत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले.