
‘नागावच्या रस्त्यावर गतिरोधक बसवा’
भिवंडी, ता. १३ (बातमीदार) : शहरातील गैबीनगर आणि इतर भागात विकासकामांसाठी रस्ते खोदले आहेत तर काही रस्त्यांचे दुरुस्तीकाम सुरू आहे. त्यामुळे नागाव भागात वाहनांची वर्दळ वाढली असून, भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे छोटे-मोठे अपघात होत आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्य मार्गावर चार ठिकाणी गतिरोधक बसविण्याची मागणी भिवंडी शहर जिल्हा काँग्रेस ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष अनंता पाटील यांनी महापालिकेकडे केली आहे.
भिवंडी महापालिका क्षेत्रात ठिकठिकाणी विकासकामे सुरू असल्याने अनेक ठिकाणी छोटी-मोठी वाहने जवळच्या मार्गावर वळविण्यात आली आहेत. त्याचा फटका नागावमधील नागरिकांना बसला असून, अरुंद रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांमुळे नेहमी अपघात होऊ लागले आहेत. या प्रकरणी वाहतूक पोलिसांना लेखी पत्र देऊन या मार्गावर वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी आणि वेगाने जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तर महापालिका आयुक्तांना लेखी पत्र देऊन गतिरोधक बनविण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी प्रभाग एकचे अधिकारी सुदाम जाधव यांनी तात्काळ बांधकाम विभागास या प्रकरणी माहिती देत गतिरोधक बनविण्याचे आदेश दिले आहेत. गतिरोधक वेळीच बनविले नाही तर या मार्गावर मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाने या वस्तुस्थितीची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणी नागाव ग्रामस्थांनी केली आहे.