
सामाजिक एकोप्याचे जुईनगरमध्ये दर्शन
जुईनगर, ता. १४ (बातमीदार)ः नवी मुंबई शहरातील सामाजिक एकोपा जपण्याचे काम राजेश पाटील, काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. त्यांच्या या कार्याचा नक्कीच अभिमान आहे. तसेच नवी मुंबई शहरालादेखील शिंदे-भाजप सरकारकडून नेहमीच सहकार्य राहील, असे प्रतिपादन विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केले आहे. जुईनगरमधील महाराष्ट्र जत्रोत्सवाच्या मंचावरून ते बोलत होते.
राजेश पाटील यांच्या माध्यमातून गेल्या २३ वर्षांपासून भव्य जत्रोत्सव भरवण्यात येत आहे. या जत्रोत्सवामध्ये सांस्कृतिक कार्यक्रमांसह ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार अशा विविध कार्यक्रमांमधून मुलांच्या कलागुणांना वाव दिला गेला आहे. या सोहळ्याला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या आहेत. त्यात भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी देखील उपस्थिती लावली होती. या वेळी भाजपचा खरा कार्यकर्ता राजेश आणि काशिनाथ पाटील यांच्या कामाचे कौतुक करत त्यांनी महाराष्ट्र जत्रोत्सवाचेदेखील भरभरून कौतुक केले आहे. यावेळी माजी महापौर जयवंत सुतार, भाजप युवा नेते जगदीश मढवी, नरेश सुतार, विजय साळे, माजी नगरसेवक गिरीश म्हात्रे, सुहासिनी नायडू तसेच इतर कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------------------------------
गेली २३ वर्षे जत्रोत्सवातून शिरवणे-जुईनगर विभागातील नागरिकांना मोठ्या संख्येने एकत्र करणे साधी गोष्ट नाही. हे काम भाजपच्या नेतृत्वाखाली राजेश पाटील, काशिनाथ पाटील यांच्या माध्यमातून होत आहे. या माध्यमातून मनोरंजन तसेच सामाजिक एकोपा जपला आहे.
- प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, भाजप