लायन्स जुहू सेंटर शाळेची गरुड भरारी! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लायन्स जुहू सेंटर शाळेची गरुड भरारी!
लायन्स जुहू सेंटर शाळेची गरुड भरारी!

लायन्स जुहू सेंटर शाळेची गरुड भरारी!

sakal_logo
By

मुंबई, ता. १४ (बातमीदार) ः मुंबई महापालिका शिक्षण विभागाच्या विशेष मुलांसाठीच्या शाळांच्या सांघिक क्रीडा स्पर्धा नुकत्‍याच पार पडल्‍या. या स्‍पर्धेत लायन्स जुहू सेंटर शाळेने विशेष मुला-मुलींच्या बास्केटबॉल व हँडबॉल स्‍पर्धेत विजयश्री खेचून आणत संपूर्ण मुंबईतून विशेष मुलांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे.
मुंबई महापालिकेच्या सर्व विभागातील विशेष मुलांसाठी असलेल्या शाळांतील मुलांच्या सांघिक क्रीडा स्पर्धा नुकत्याच भायखळा येथील महापालिका शाळा मैदानात आयोजित करण्यात आल्या होत्या. या स्पर्धांचे उद्घाटन पालिका शिक्षणाधिकारी राजेश कंकाळ यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख राजेश गाडगे तसेच शिक्षण विभागातील अन्य अधिकारी उपस्थित होते.
या क्रीडा स्पर्धेत विशेष मुलांच्या १८ शाळा सहभागी झाल्या होत्या. यामध्ये बास्केटबॉल व हँडबॉलमध्ये मुला-मुलींचे सात सात संघ सहभागी झाले होते. या क्रीडा स्पर्धेत संपूर्ण वर्चस्व लायन्स जुहू सेंटर मनपा शाळेच्या मुला-मुलींच्या संघाचे दिसून आले. या शाळेच्या बास्केटबॉल व हँडबॉल स्पर्धेतील गुलाफशान, दीपाली खेरना, श्रुती, सोनाली, सृष्टी, लिवीलियान, पूर्वी, वैष्णवी, निशा, दीक्षा व हर्षदा या मुलींनी; तर आशीष गुप्ता, भव्य, प्रज्वल, करण, अमित, अरमान, वंश जाधव, वंश दळवी, आर्यन, सोहम, जिनत, सम्यक या खेळाडूंनी एकही सामना न हारता चारही स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला. सर्वाधिक गोल मुलांमध्ये आशीष गुप्ता; तर मुलींमध्ये गुलाफशान व दीपाली या खेळाडूंनी केले. या सर्व स्पर्धकांची प्रशिक्षक बाबाराव वानखेडे व प्रांजल निवंडेकर यांनी शाळेच्या मुख्याध्यापिका रिटा पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली तयारी करून घेतली. या विशेष मुलांनी मिळवलेल्या यशाबद्दल उपशिक्षणाधिकारी आशा मोरे व उपशिक्षणाधिकारी संगीता तेरे यांनी मुलांचे खास अभिनंदन केले.