लाभार्थींच्या अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लाभार्थींच्या अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत
लाभार्थींच्या अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

लाभार्थींच्या अर्जासाठी २८ फेब्रुवारीपर्यंत मुदत

sakal_logo
By

डहाणू, ता. १३ (बातमीदार) : डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत डहाणू, तलासरी, पालघर, वसई तालुक्यातील अनुसूचित जमातींच्या लाभार्थ्यांकरिता उत्पन्न वाढीच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ घेण्याकरिता २८ फेब्रुवारीपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. याचा लाभ घेण्याचे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा डहाणू एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी संजिता महापात्र यांनी केले आहे.
आदिवासी विकास योजनेअंतर्गत अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांकरिता किराणा दुकान सुरू करणे करिता अर्थ सहाय्य करणे, भाजीपाला व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणे, भाजीपाला उत्पादन घेणाऱ्या शेताला तार कुंपण करणे, औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण झालेल्या युवक युवतींना व्यवसायासाठी अर्थसहाय्य करणे तसेच अनुसूचित जमातीच्या बचतगटांना वीट भट्टी, डीजे, मंडप, बॅन्जो आणि इतर साहित्य खरेदीसाठी डीबीटीद्वारे अर्थसहाय देण्यात येत. तसेच नृत्य पथकास त्यांची संस्कृती व समृद्धी यांचे जतन करण्यासाठी कपडे, ढोल, तारपा, घुंगरू, थाळी खरेदी करण्यासाठी डीबीटीद्वारे अर्थसहाय्य केले जाणार आहे.

------------------
अर्ज करण्यासाठी आवश्यक पूर्तता
योजनांचा वैयक्तिक लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी जातीचा दाखला, रहिवाशी दाखला, शिधापत्रिका, दारिद्र्यरेषेखालील दाखला किंवा २०२१-२२ मधील उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, बँक पासबुक; तर अनुसूचित जमातीच्या बचतगटाने लाभ घेण्यासाठी बचतगटाचे नोंदणी प्रमाणपत्र, बचतगटाचे बँक पासबुक, व्यवसाय सुरू करण्यात येणाऱ्या जागेचा सातबारा उतारा किंवा बचत गटाची स्वतःची जागा, खाजगी जागा अथवा भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेचे संमती पत्र, त्याचप्रमाणे ग्रामसभेचा ठराव, सर्व सदस्यांचा एकत्रित फोटो असणे आवश्यक आहे, असे प्रकल्प अधिकारी संजिता महापात्र यांनी कळवले आहे.