
जुने डम्पिंग ग्राऊंड पुन्हा धुमसले
अंबरनाथ, ता. १३ (बातमीदार) : अंबरनाथच्या फॉरेस्ट नाका परिसरातील जुन्या डम्पिंग ग्राऊंडला पुन्हा आग लागल्याचा प्रकार घडला आहे. सुमारे दीड वर्षांपूर्वी डम्पिंग ग्राऊंड स्थलांतरित करण्यात आले आहे. न्यायालयाच्या इमारतीसमोर असलेले डम्पिंग ग्राऊंड बंद होऊन दीड वर्षे उलटले तरी अद्याप या डम्पिंग ग्राऊंडला आग लागण्याचे प्रकार घडत आहेत. अंबरनाथ फॉरेस्ट नाका परिसरात नगरपालिकेचे जुने डम्पिंग ग्राऊंड असून, त्या ठिकाणी न्यायालयाची नवी इमारत उभारल्याने ते ग्राऊंड नगरपालिकेला स्थलांतरित करावे लागले होते. ते स्थलांतरित करीत असताना पालिकेने असलेल्या कचऱ्यावर मातीचा भराव टाकून डम्पिंग ग्राऊंड बुजविण्यात आले. डम्पिंग ग्राऊंड बंद होऊन दीड वर्षे झाली तरी अद्याप त्या ठिकाणचा त्रास मात्र कमी झालेला नाही. मागील आठवड्यात शनिवारी डम्पिंग ग्राऊंडला आग लागल्याने त्या ठिकाणचा कचरा जळाला होता. त्यासोबतच परिसरातील झाडेझुडपे देखील जळू लागल्याने त्याठिकाणी वणव्याचे स्वरूप आले होते. आगीमुळे परिसरात धुराचे साम्राज्य पसरले होते. डम्पिंग ग्राऊंड बंद झाला तरी रस्त्याच्या बाजूला उघड्यावर कचरा टाकल्याचे आढळून येते. जुन्या डम्पिंग ग्राऊंडच्या ठिकाणी आग लागल्याचे समजताच पालिकेच्या अग्निशमन दलामार्फत आग विझवण्यात आल्याचे पालिका प्रशासनातर्फे सांगण्यात आले.