
जनावरांच्या बेकायदाप्रकरणी ट्रकचालकाला अटक
शहापूर, ता. १३ (बातमीदार) : बैलांना ट्रकमध्ये कोंबून बेकायदा वाहतूक करणाऱ्या चालकाला शहापूर पोलिसांनी शिताफीने जेरबंद केले. मुंबई - नाशिक महामार्गावर आसनगावजवळ गस्त घालणाऱ्या पोलिसांना चकमा देत निसटणाऱ्या संशयित ट्रकचा पाठलाग करून चालकाला अटक करण्यात आली. याप्रकरणी ट्रक जप्त करण्यात आला असून १५ बैलांची सुटका करण्यात आली. नाशिकहून मुंबईमध्ये कत्तलीसाठी बेकायदा जनावरे घेऊन जाणार असल्याची खबर शहापूर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी महामार्गावर पाळत ठेवली होती. आज (ता. १३) मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या संशयित ट्रकला पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र ट्रकचालक निसटल्याने पोलिसांनी त्याचा पाठलाग करीत मोठ्या शिताफीने ट्रक चालकाला ताब्यात घेतले. ट्रकची तपासणी केली असता त्यामध्ये बैलांना निर्दयीपणे कोंबण्यात आल्याचे निदर्शनास आले. पशुसंवर्धन अधिकारी व प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांची परवानगी नसल्याने गुन्हा दाखल करत ट्रकचालक साजिद बेग याला अटक केली. ट्रकमधील बैलांची सुटका करत त्यांना भिवंडी येथील गोशाळेत नेण्यात आल्याचे शहापूर पोलिसांनी सांगितले.