
व्हॅलेंटाईनडेचे गिफ्ट देण्यासाठी प्रियकराने चोरली दुचाकी
नालासोपारा, ता. १३ (बातमीदार) : ‘व्हॅलेंटाईन डे’ला आपल्या प्रेयसीला काय गिफ्ट द्यायचे, या चिंतेत अनेक प्रियकर आहेत. मात्र वसईतील एका अतिउत्साही प्रियकराने गिफ्ट देण्यासाठी चक्क इलेक्ट्रिक दुचाकीची चोरी केल्याची घटना उघड झाली आहे. या घटनेत माणिकपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपीकडून पाच दुचाकी जप्त केल्या आहेत. आरोपीने आणखी काय गुन्हे केले आहेत का, याचा तपास सुरू असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संपतराव पाटील यांनी सांगितले.
चंद्रेश पाठक असे अटक आरोपी प्रियकराचे नाव आहे. नायगाव स्थानकाजवळ पार्क केलेली इलेक्ट्रिक दुचाकी चोरी झाल्याची तक्रार माणिकपूर पोलिस ठाण्यात दाखल झाली होती. वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांमुळे माणिकपूर पोलिसांनी चोरट्यावर लक्ष केंद्रित केले होते. गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषण करून आरोपी चंद्रेश पाठक याला दहिसर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने ‘व्हॅलेंटाईन डे’ला आपल्या प्रेयसीला गिफ्ट देण्यासाठी दुचाकी चोरी केली असल्याचे सांगितले. चंद्रेशकडून तीन लाख ९० हजार किमतीच्या पाच दुचाकी पोलिसांनी हस्तगत करून दोन गुन्हे उघड केले आहेत.