
मुलांमध्ये अॅडिनो व्हायरस संसर्ग
‘अॅडिनो’ विषाणूसंकटापासून मुंबई तूर्त दूर
पुण्यामधील संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्याचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १४ : पुण्यात लहान मुलांमध्ये अॅडिनो व्हायरसचा संसर्ग वाढला असून मुलांमध्ये ताप, टॉन्सिल्स वा घशाबाबतच्या काही तक्रारी दिसल्यास किंवा त्यांच्या प्रकृतीत काही बिघाड जाणवल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे. दरम्यान, मुंबईत अद्याप असा संशयित संसर्ग दिसून येत नसल्याचे बालतज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले असले तरी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
काही दिवसांपासून मुलांमध्ये ताप येणे, टॉन्सिल्स दुखणे, घसा खवखवणे आदींसह डोळ्यातील लाली अशी लक्षणे दिसून येत आहेत. अशी लक्षणे ॲडिनो विषाणू संसर्गाची असून ५ ते १५ वयोगटातील मुलांमध्ये प्रामुख्याने ती आढळून येत आहेत. त्यात अचानक वाढ झाली असून गेल्या महिनाभरात संसर्ग बळावत असल्याचे दिसून आल्याचे सांगण्यात आले. पुण्यातील पार्श्वभूमीवर मुंबईतील मुलांमधील आजाराच्या लक्षणांबाबत बालरोगतज्ज्ञ आणि वैद्यकीय तज्ज्ञांशी संपर्क साधला असता त्यांनी अशी शक्यता फेटाळून लावली. त्याबाबत बोलताना अपोलो हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसीन तज्ज्ञ डॉ. अमित शोभावत यांनी मुंबईतील मुलांमध्ये अद्याप तरी अशी लक्षण दिसून येत नसल्याचे स्पष्ट केले. मात्र, संबंधित आजार विषाणूजन्य असल्याने मुलांची काळजी घेणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञ स्पष्ट करत आहेत.
रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या मुलांना जपा
अॅडिनो विषाणूच्या संसर्गामुळे मुलांची श्वसननलिका, आतडे, डोळा, मूत्रमार्ग इत्यादी भागांना बाधा पोहचते. परिणामी सर्दी, न्यूमोनिया, पचनाचे आजार आणि मूत्रमार्गाच्या तक्रारी उद्भवू शकतात. अशा विषाणूजन्य आजाराचे अनेक प्रकार आहेत. अॅडिनो व्हायरस गुंतागुंतीचा असून त्यामुळे न्यूमोनियासारखे आजार जडू शकतात. रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या मुलांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक असल्याचे बालरोगतज्ज्ञ सांगत आहेत.