
बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने २० जखमी अपघातात जखमी
पालघर, ता. १३ (बातमीदार) : पालघरवरून कमारे येथे भरधाव वेगाने जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसच्या चालकाचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी पालघरच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले. पालघर स्थानकातून दुपारी दोन वाजून २० मिनिटांनी सुटणारी कमारे येथे जाणारी बस नवली येथून पुढे जात असताना रस्त्यातील खचलेल्या मोरीमुळे निर्माण झालेल्या खड्ड्यात आदळून चालकाचे नियंत्रण सुटले. त्यामुळे झालेल्या अपघातात एसटीमधील विद्यार्थी आणि प्रवासी बसच्या अंतर्गत भागात आदळले. या घटनेत दहा विद्यार्थी आणि दहा प्रवासी असे एकूण २० जण जखमी झाले. त्यांच्यावर पालघरच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करून त्यांना सोडण्यात आले. एक महिलेला मार बसल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींना उपचारासाठी मिळणारी रक्कम देण्याचे काम सुरू आहे, असे पालघर परिवहन विभागाकडून सांगण्यात आले