पक्षांतरामागे क्लस्टरचे ‘अर्थकारण’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षांतरामागे क्लस्टरचे ‘अर्थकारण’
पक्षांतरामागे क्लस्टरचे ‘अर्थकारण’

पक्षांतरामागे क्लस्टरचे ‘अर्थकारण’

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १३ : मतदारसंघात क्लस्टर विकास करण्यासाठी पक्षांतर करत असल्याचे ज्येष्ठ माजी नगरसेवक हणमंत जगदाळे सांगत आहेत. त्यांना लोकांचा विकास करताना स्वयंविकास साधायचा आहे, असा घणाघात राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी केला. केवळ क्लस्टरचे अर्थकारण नव्हे, तर येऊर येथे अडकलेला बंगलो प्रकल्पाचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी हा आटापिटा असल्याचेही परांजपे यांनी म्हटले आहे.

हणमंत जगदाळे यांनी तीन नगरसेवकांसह बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केला. याबाबत आनंद परांजपे यांनी पक्षाची भूमिका सोमवारी (ता. १३) पत्रकारांसमोर स्पष्ट केली. लोकमान्य नगर, शास्त्रीनगर, सहकारनगर येथील क्लस्टरच्या योजनेला गती मिळावी, यासाठी मुख्यमंत्र्यांच्या बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश करीत असल्याचे हणमंत जगदाळे यांनी सांगितले. या वक्तव्याचा समाचार घेताना आनंद परांजपे म्हणाले की, क्लस्टर योजना सरकारने जाहीर केली, त्यावेळी लोकमान्य नगरचाही समावेश होता. एकदा सरकारने योजना जाहीर केल्यानंतर त्या भागातील नगरसेवक कोणत्या पक्षाचा आहे, यावर सरकारची योजना ठरत नसते; पण जगदाळे हे बांधकाम व्यावसायिकही असल्याने त्यांना एफएसआय, टीडीआर जास्त कळत असेल. क्लस्टरमध्ये लोकांचा विकास करता करता त्यांना स्वयंविकासदेखील बांधकाम व्यावसायिक म्हणून करायचा असेल. याबद्दल बांधकाम व्यावसायिक म्हणून तेच सांगू शकतील, असा टोला परांजपे यांनी लगावला.

शरद पवारांनी मानसन्मान दिला
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी हणमंत जगदाळे यांना राजकारणात नाव, सन्मान, पदे दिली; पण या मानसन्मापेक्षा हणमंत जगदाळे यांना क्लस्टरचे अर्थकारण महत्त्वाचे वाटले असेल, पण लोकमान्य नगर प्रभागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारा मोठा मतदार आहे. आगामी निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने लढेल, असे आव्हान आनंद परांजपे यांनी जगदाळे यांना दिले.