
चित्रकार, अभिनेत्री ललिता लाजमी यांचे निधन
मुंबई, ता. १३ : दिवंगत निर्माते-दिग्दर्शक तसेच अभिनेते गुरुदत्त यांची बहीण तसेच ज्येष्ठ चित्रकार ललिता लाझमी (वय ९०) यांचे सोमवारी (ता. १३) मुंबईत निधन झाले. आजारपणामुळे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्यांची प्राणज्योत मालवली.
लाझमी यांचा जन्म कोलकाता येथे झाला; पण त्यांचे बालपण मुंबईत गेले. मॅट्रिकनंतर त्यांचा मुंबई पोर्ट ट्रस्टमध्ये नोकरी करणाऱ्या गोपाळकृष्ण लाझमी यांच्याशी विवाह झाला. चित्र निर्मिती करणे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांना शास्त्रीय नृत्यातदेखील स्वारस्य होते. आयुष्याच्या अखेरपर्यंत ललिता लाजमी त्यांच्या शैलीत मानवी जीवनाचे विविध पैलू रंगवत राहिल्या. ललिता या दिवंगत हिंदी दिग्दर्शक, निर्माते आणि अभिनेते गुरूदत्त यांच्या बहीण होत्या. आमिर खानच्या ‘तारे जमीन पर’ या चित्रपटात ललिता यांनी छोटेखानी भूमिका केली होती. त्यांचे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट येथे प्रदर्शन सुरू असून त्याच वेळी त्यांनी जगाचा निरोप घेतल्याने अनेकांनी हळहळ व्यक्त केली.