पाटकर महाविद्यालयात ‘एसएसएफएस’ची धूम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाटकर महाविद्यालयात ‘एसएसएफएस’ची धूम
पाटकर महाविद्यालयात ‘एसएसएफएस’ची धूम

पाटकर महाविद्यालयात ‘एसएसएफएस’ची धूम

sakal_logo
By

गोरेगाव, ता. १४ (बातमीदार) : गोरेगाव येथील पाटकर-वर्दे महाविद्यालयातील मल्टी मीडिया आणि मास कम्युनिकेशन विभागाचा एस.एस.एफ.एस. (सिल्वर स्क्रीन फिल्म सोसायटी) हा महोत्‍सव नुकताच पार पडला. या महोत्‍सवाचे हे दहावे वर्ष आहे. या महोत्‍सवाअंतर्गत नवोदित फिल्म मेकर्स आपली शॉर्ट फिल्म आणि ॲड फिल्म स्पर्धेमध्ये प्रदर्शित करत असतात. या कार्यक्रमाचे उद्‌घाटन विद्याधर पाठारे, आनंद गोराडिया व सचिन पटेकर यांच्या उपस्थितीत पार पडले. या वेळी सचिव डॉ. गुरुनाथ पंडित, सह मुख्य शिक्षणाधिकारी डॉ. माला खारकर आणि प्राचार्या डॉ. प्रतिभा गायकवाड उपस्थित होते.

दिलीप जगताप मराठा महासंघाचे अध्यक्ष
मुंबई, ता. १४ : अखिल भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी दिलीप जगताप यांची निवड झाली आहे. संघटनेच्या निवडणुका सोमवारी झाल्या. या निवडणुकीत महासंघाच्या सरचिटणीसपदी संभाजीराजे दहातोंडे, उपाध्यक्षपदी संतोष नानवटे, खजिनदारपदी श्रीरंग बरगे व विभागीय चिटणीसपदी दशरथ पिसाळ यांची निवडणूक प्रक्रियेद्वारे निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी दगडू बागवे यांनी हा निकाल जाहीर केला. महासंघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दादरच्या राजर्षी शाहू सभागृहात झाली. सभेला ५०७ सभासद हजर होते. या सभेत सर्वानुमते माजी सरचिटणीस राजेंद्र कोंडरे व माजी खजिनदार प्रकाश देशमुख यांची महासंघविरोधी कारवाया केल्याबद्दल कायमस्वरूपी हकालपट्टी करण्यात आली व त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. या सभेला आमदार भाई जगताप हे हजर होते; तर सभेच्या अध्यक्षस्थानी सदानंद चव्हाण होते. महासंघाचे दिवंगत माजी अध्यक्ष ॲड. शशिकांत ऊर्फ आप्पासाहेब पवार यांना या वेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.

मतदार यादींचे विशेष संक्षिप्‍त पुनर्निरीक्षण
जोगेश्वरी, ता. १४ (बातमीदार) ः भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. आयोगाने आगामी सर्वसाधारण निवडणुकांच्या दृष्टिकोनातून अचूक मतदार यादी तयार करण्यासाठी पारदर्शक उपाययोजनांची अंमलबजावणी करण्‍यात येणार आहे. यासाठी एकाच यादी भागातील, एकाच विधानसभा मतदारसंघातील वेगवेगळ्या यादी भागातील, राज्‍यातील वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघातील साधर्म्‍य असलेले तेच छायाचित्र वगळणी करण्याकरिता तसेच एकाच मतदाराला एकापेक्षा अधिक फोटो ओळखपत्रे वितरित केलेले असणे, एकच मतदार फाटो ओळखपत्र क्रमांक एकापेक्षा अधिक मतदारांना दिलेला असणे, तसेच मतदार फोटो ओळखपत्र वितरित न झालेले मतदार शोध कार्यक्रम हाती घेण्‍यात आला आहे. यासाठी जोगेश्‍वरी विधानसभा क्षेत्रात घरोघरी सर्वेक्षण सुरू करण्‍यात आले आहे. या मोहिमेला सहकार्य करण्‍याचे आवाहन मतदार नोंदणी अधिकारी गणेश बेल्‍लाळे, सहायक मतदार नोंदणी अधिकारी अश्विन रोहिणीकर, नायब तहसीलदार नेहा हिर्लेकर यांनी केले आहे.

मालाड पश्चिमेतील इमारतीमध्‍ये आग
मालाड, ता. १४ (बातमीदार) ः मालाड पश्चिम येथील धीरज जमुना या इमारतीच्या ई विंगमधील १०२ या फ्लॅटमध्ये काल (ता. १३) आग लागली होती. या वेळी त्वरित अग्निशमन दल पोहचल्याने आगीवर नियंत्रण मिळवले. या आगीचे कारण स्पष्ट झालेले नाही. पोलिस आणि अग्निशमन दल पुढील तपास करत आहेत.

धारावी कुंभारवड्यात चोरी
धारावी, ता. १४ (बातमीदार) : धारावीतील कुंभारवाडा येथील चौथी वाडीमधील एका घरातून सोने व रोख रक्कम असा एकूण सहा लाख ३० हजार रुपयांच्‍या ऐवजाची चोरी झाली आहे. ही चोरी रविवारी (ता. १२) रात्री उघडकीस आली. या प्रकरणी धारावी पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंदवण्यात आला आहे. कुंभारवाडा येथील रहिवासी चंद्रकांत सोळंकी बहिणीच्या मुलीच्या लग्नासाठी बोईसर येथे १० फेब्रुवारी रोजी घराला कुलूप लावून गेले होते. लग्न समारंभानंतर सोळंकी कुटुंबीय घरी पोहचले असता घराचे कुलूप तोडलेले आढळले. घरातील एकूण २३२ ग्राम सोने व रोख ५० हजार रुपये चोरीस गेल्याचे आढळून आले. या संदर्भात सोळंकी यांनी धारावी पोलिस ठाणे येथे तक्रार दाखल केली आहे. धारावी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कांदळगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सारंग लंबे पुढील तपास करत आहेत.

शिवसेनेतर्फे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः पवई आयआयटी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शाखा क्रमांक १२२ चे शाखाप्रमुख सचिन मदने यांच्या तर्फे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने पवई सिनेमा ग्राऊंड, आयआयटी मेनगेट येथे आमदार चषक जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचा शुभारंभ आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी शिवसेना उपनेते दत्ता दळवी, महिला विभाग संघटिका राजराजेश्वरी रेडकर, माजी नगरसेवक चंदन शर्मा, उपेंद्र सावंत, शेखर जाधव, धर्मानात पंत, आनंद पाताडे आदी मान्‍यवरांसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

माजी महापौर आर.आर.सिंह यांची स्मरणसभा
मुलुंड, ता. १४ (बातमीदार) ः मुंबईचे पहिले उत्तर भारतीय महापौर, मुंबई काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष, मुलुंडच्या नियोजनबद्ध विकासाचे शिल्पकार आर. आर. सिंह यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी समारंभ, भजन संध्या कार्यक्रमाचे आयोजन मुलुंड पूर्वेतील आर. आर. एज्युकेशनल ट्रस्ट हॉल येथे करण्यात आले होते. या प्रसंगी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम, माजी खासदार रमेश दुबे, मुंबई काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष चरणसिंग सप्रा आदी मान्‍यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. या कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते गरजू विद्यार्थ्यांना ट्रायसायकल व शालेय गणवेश प्रदान करण्यात आले. या वेळी प्रियंका म्युझिकल ग्रुपतर्फे गीत-संगीताने श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन आर. आर. एज्‍युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. आर. आर. सिंग यांनी केले; तर सूत्रसंचालन डॉ. बाबुलाल सिंग, राजेश इंगळे यांनी व प्रास्ताविक मोहनलाल राज यांनी केले.

संदेश विद्यालयाचा आदर्श शाळा पुरस्काराने गौरव
घाटकोपर, ता. १४ (बातमीदार) ः शिक्षक लोकशाही आघाडी व जॉय सामाजिक संस्था यांच्या वतीने ज्ञान प्रसारक शिक्षण संस्थेच्या विक्रोळी येथील संदेश विद्यालयाला आदर्श शाळा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मुंबईचे माजी उपमहापौर बाबुभाई भवानजी यांच्या हस्ते संस्थेच्या खजिनदार प्राचार्य डॉ. सुखदा चिराटे यांनी पुरस्कार स्वीकारला. या वेळी कामगार नेते व अर्थतज्ज्ञ विश्वास उटगी, टी.डी.एफ. मुंबईचे अध्यक्ष जनार्दन जंगले, कार्याध्यक्ष शिवाजी कुलाळ आदी मान्यवर उपस्थित होते.

तायक्‍वांदो स्पर्धेत भांडुपमधील विद्यार्थ्यांची बाजी
भांडुप, ता. १४ (बातमीदार) ः पुणे येथे पार पडलेल्‍या स्पर्धेत छत्रपती तायक्‍वांदो अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत रामगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी १८ पदकांची कमाई केली होती. या दरम्यान साऊथ कोरिया येथे होणाऱ्या तायक्‍वांदो स्पर्धेसाठी यातील १३ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. पुणे येथे पार पडलेल्‍या स्पर्धेत एकूण ९०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. यात दिशा माने, अमितेश माने, भावेश तपेकर, अर्णव मोंडकर या विद्यार्थ्यांनी रौप्य पदक तसेच साईल वरांडेकर, गौरेश महाजन, हितेन सिंगल, आदित्य भंडारी, श्रेया बागवे, यश निमदे, विरेन गावडे, अमर्त्य गिरी, ओम गिरी यांनी कांस्य पदक पटकावले आहे.