
मेट परिसरात वीजेचा लपंडाव
वाडा, ता. १४ (बातमीदार) : तालुक्यातील मेट परिसरात सध्या विजेचा लपंडाव सुरू असून तासन् तास वीज गायब होण्याचे प्रमाण वाढले आहे. यामुळे नागरिकांसह उद्योजकही हैराण झाले आहेत. यामुळे दैनंदिन कामात अडचणी निर्माण होत आहोत. जुनाट उपकरणे व वीज केंद्रात बिघाड होत असल्याने वारंवार वीज जाण्याचे प्रमाण वाढले आहेत.
वीज गेल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होत असून डासांमुळे झोपही लागत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. याशिवाय मोबाईलसाठी चार्जिंग उपलब्ध नसल्याने अनकांचे मोबाईल बंद असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात आले. वीजपुरवठा सुरळीतपणे न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे. यासंदर्भात कुडूस वीज विभागाचे शाखा अभियंता पराग बोरसे यांच्याशी संपर्क साधला असता विजेचा दोष काल सापडला नसल्याने वीज नव्हती. आता दोष सापडला असल्याने वीजपुरवठा सुरळीत होईल, अशी माहिती त्यांनी दिली.