
दिव्यांग बांधवांचा क्रिकेट सामन्यात उत्साह
वसई, ता. १४ (बातमीदार) : अपंग जनशक्ती संस्था तसेच महाराष्ट्र नवनिर्माण दिव्यांग सेना वसई-विरार शहर अध्यक्ष देविदास जयवंत केंगार यांनी दिव्यांग बांधवांसाठी क्रिकेट स्पर्धेचे आयोजन वसईत केले होते. या वेळी अपंग जनशक्ती चषक २०२३ चा मानकरी घाटकोपर येथील जय अंबे दिव्यांग संघ ठरला; तर कल्याण इलेव्हन दिव्यांग संघाने उपविजेतेपद पटकावले.
अपंग जनशक्ती चषक २०२३ या दिव्यांग क्रिकेट सामन्यांमध्ये दिव्यांग संघांना खेळण्यासाठी मोफत प्रवेश देण्यात आला. या वेळी पालघर, मुंबई व आजूबाजूच्या परिसरातील दिव्यांग संघाने सहभाग घेत फलंदाजी, गोलंदाजीची चुणूक दाखवली. क्रिकेट सामन्याचे समालोचन व सूत्रसंचालन विनय घोगले, कल्पेश गायकर, आकाश पवार यांनी केले.
याप्रसंगी माजी सभापती रमेश घोरकना, मनसेचे पालघर-ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, मनसेचे वसई-विरार शहर अध्यक्ष प्रवीण भोईर , माजी नगरसेवक प्रफुल पाटील, स्वप्नील डिकुन्हा, जयेंद्र पाटील तसेच वालीव विभाग प्रमुख शंकर कदम यांच्यासह अन्य मान्यवरांनी भेट देत कौतुक केले. अपंग जनशक्ती संस्थेचे अध्यक्ष देविदास जयवंत केंगार, उपाध्यक्ष रवींद्र सोनवणे, सचिव चंपक शहा, खजिनदार अशोक पुजारी, गोपीचंद नाक्ती, विनय घोगले, जितू जयस्वाल, लालासाहेब धायगुडे, नीलेश भूताव आदींनी आयोजन यशस्वी केले.