
दुहेरी मालमत्ताकरावर २२ फेब्रुवारीला निकाल
खारघर, ता. १४ (बातमीदार) : पनवेल महापालिकेकडून आकारण्यात आलेल्या दुहेरी मालमत्ताकराविरोधात खारघरमधील संविधानी लोक आंदोलनच्या वतीने दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर दोन्ही बाजूने युक्तिवाद पूर्ण झाला आहे. या याचिकेवर २२ फेब्रुवारीला निकाल लागणार असल्यामुळे सिडको वसाहतीमधील मालमत्ताधारकांचे लक्ष आता निकालांकडे लागले आहे.
पनवेल महापालिकेने २०१६ पासून सिडको वसाहतीमधील मालमत्ताधारकांना लावलेल्या दुहेरी मालमत्ता कर व इतर समस्यांविरोधात खारघरमधील संविधानी लोक आंदोलनाच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेतील प्राथमिक मुद्द्यावरील सुनावणी झाली आहे. या वेळी न्यायालयाने दोन्ही बाजूंची मत ऐकून घेतली होती. या वेळी महापालिकेच्या वतीने बाजू मांडताना याचिकाकर्त्यांना कायद्यानुसार टॅक्स अपील दाखल करण्याचा अधिकार दिलेला असताना त्यांना उच्च न्यायालयात याचिका करता येत नाही. हे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी न्यायालयाने २२ फेब्रुवारी रोजी निकाल जाहीर होईल, असे सांगितले. या वेळी संविधानी लोक आंदोलनाचे समन्वयक ॲड. जे. पी. खारगे, ॲड. विराज पाटील आणि ॲड. नम्रता तालाकोकुला काम पाहत होते.
---------------------------------
प्राथमिक मुद्द्यांच्या बाबतीत याचिकाकर्त्यांचे म्हणणे न्यायालयाने ग्राह्य धरले, तर याचिका गुणदोषांवर उच्च न्यायालयात चालेल. पालिकेच्या बाजूने निकाल लागला, तर मालमत्ताकराच्या विरोधात टॅक्स अपील करून मालमत्ताधारकांना न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
- जे. पी. खारगे, वकील, संविधानी लोक आंदोलन समन्वयक