बदलापुरात शिवकालीन इतिहासाचा जागर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बदलापुरात शिवकालीन इतिहासाचा जागर
बदलापुरात शिवकालीन इतिहासाचा जागर

बदलापुरात शिवकालीन इतिहासाचा जागर

sakal_logo
By

बदलापूर, ता. १६ (बातमीदार) : आगरी महोत्सव, मालवणी महोत्सवानंतर आता बदलापूर सकल मराठा समाज तालुका, अंबरनाथ यांच्या वतीने मराठा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल, बदलापूर पूर्व या ठिकाणी १७ ते २१ फेब्रुवारी या पाच दिवसात या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने शहरात विविध सांस्कृतिक उपक्रमांच्या मेजवानीचा आस्वाद बदलापूरकरांना घेता येणार आहे. यावेळी शिवकालीन युद्ध कला, शाहीर वैभव घरत यांच्या पोवाडा तसेच अनेक शासकीय अधिकारी वर्गांचा सन्मान या निमित्ताने करण्यात येणार आहे.

बदलापूर शहर म्हणजे संस्कृतीचे माहेरघरच म्हणावे लागेल. नव्याने बदलापूर शहर सांस्कृतिक क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण करत आहेत. शहरात वास्तव्यास असणाऱ्या तसेच कलेशी निगडित असणाऱ्या अनेक रसिक बदलापूरकरांनी पुढाकार घेऊन या उपक्रमाचे आयोजन केले आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात शहरात कोणताही सांस्कृतिक उपक्रम घेता आला नाही. त्यामुळे त्या दोन वर्षांची कसर काढून, शिवकालीन इतिहास जपण्यासाठी यंदा मोठ्या स्तरावर हा महोत्सव घेण्यात येणार आहे. बाईक रॅली, शिवकालीन युद्ध कला सादर करण्यासाठी संतोष चव्हाण यांच्या गार्गी सोशल अकादमीच्या वतीने लाठी काठी, तलवार, दांडपट्टा या कलेचे प्रात्यक्षिक, शिवशाहीर वैभव घरत यांचे शिवचरित्रावर आधारित पोवाडे, तसेच अनेक आजी-माजी शासकीय अधिकारी वर्ग, देशातील सर्वोच्च पदावर विराजमान अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा या निमित्ताने आयोजित करण्यात आला आहे.
---------------------------------
शिवकालीन परंपरेचे जतन
महोत्सवात मुख्य आकर्षण म्हणजे, २५० कलाकारांना घेऊन मराठ्यांची गौरवगाथा हे महानाट्य सादर होणार आहे. मराठी व शिवकालीन परंपरा जतन करणे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पाच दिवसीय कार्यक्रमाचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन यावेळी कार्यक्रमाच्या आयोजकांनी केले आहे.