
२८० मिनीबसची सेवा समाप्त
मुंबई, ता. १४ ः मुंबईतील अरुंद रस्ते असलेल्या परिसरात बेस्टने भाडेतत्त्वावरील मिनीबसची सेवा सुरू केली होती; मात्र कंत्राटदाराकडून सुमार दर्जाची सेवा पुरवली जात असल्याने तसेच करारानुसार अटी व शर्तींचे पालन केले जात नसल्याने २८० बसगाड्या ताफ्यातून कमी करण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला.
अतिगर्दीच्या आणि दाटीवाटीच्या परिसरात सेवा देणाऱ्या मिनी बसगाड्यांना चांगला प्रतिसाद मिळाला होता; परंतु या बसगाड्यांची वारंवारिता आणि देखभाल-दुरुस्तीच्या मुद्द्यावर बेस्टने कंत्राटदाराला अनेकदा सूचना केल्या होत्या. मुंबईकरांना सेवा पुरवणाऱ्या २८० मिनीबस गाड्यांची सेवा अतिशय सुमार होती. त्यामध्ये चालणारा एसीदेखील पुरेशा क्षमतेचा नसल्याने तसेच देखभाल-दुरुस्तीची जबाबदारी कंत्राटदाराने नीट पार न पाडल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे बेस्ट प्रशासनाकडून सांगण्यात आले.
करारानुसार कंत्राटदाराला बेस्ट उपक्रमाकडून देय असलेली तीन कोटींची रक्कम रोखण्यात आली आहे. त्यामुळे बेस्टच्या कंत्राटी चालकांच्या शिष्टमंडळाने महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांची काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती.
----
सेवा सुधारण्यासाठी कंत्राटदार कंपनीला बेस्ट प्रशासनाने अनेकदा नोटिसा बजावल्या; परंतु सेवेत सुधारणा होत नसल्याने अखेर २८० मिनी बसगाड्या ताफ्यातून कमी करण्यात आल्या आहेत.
- लोकेश चंद्र, महाव्यवस्थापक, बेस्ट उपक्रम