
२०२४ च्या निवडणुकीत विजय भाजपाचाच : अनुराग ठाकुर
कळवा/डोंबिवली, ता. १४ (बातमीदार) : देशातील ईशान्येकडील राज्यांबरोबरच तमिळनाडूतूनही भाजपला वाढता प्रतिसाद मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२४ च्या निवडणुकीत भाजपचाच विजय होईल, असा विश्वास केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांनी आज येथे व्यक्त केला; तर महाराष्ट्रात डबल इंजिन सरकारची ताकद आणखी वाढेल, सरकार जाणार असल्याची आशा असलेल्यांना निराशा पत्करावी लागेल, असा टोलाही ठाकूर यांनी विरोधकांना लगावला.
कल्याण लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या संघटनात्मक स्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा दौरा आयोजित करण्यात आला आहे. कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ठाकूर यांनी दौऱ्याची सुरुवात केली. या वेळी कल्याण लोकसभा प्रभारी व आमदार संजय केळकर, आमदार प्रवीण दरेकर, आमदार निरंजन डावखरे, प्रदेश सचिव संदीप लेले आदींसह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. भाजपकडून देशभरात पक्षाचा विस्तार केला जात आहे. त्यानुसार त्यांचा कल्याणमध्ये हा दुसरा दौरा आहे. छत्रपती शिवाजी महाराज व जनतेचा आम्हाला कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी आशीर्वाद मिळेल, असा विश्वास मंत्री अनुराग ठाकूर यांनी व्यक्त केला. या वेळी खेलो इंडिया स्पर्धेत विजेतेपद मिळवलेल्या खेळाडूंचा ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या ठिकाणी मंत्री अनुराग ठाकूर यांचा हा कल्याण लोकसभा मतदारसंघाचा दुसरा दौरा होत असून येथे भाजप दावा ठोकणार आहे का? याविषयी प्रश्न विचारला असता, इथून कोण लढणार, इथला उमेदवार कोठे जाणार, याची चिंता तुम्ही करू नका. आम्ही एकत्रित लढू, जोरदार लढू आणि आधीपेक्षा जास्त विजय संपादन करू, असे त्यांनी सांगितले.
काँग्रेसवर टीका
-------------
यंदाच्या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने पूर्वीच्या तुलनेत ११ टक्के ज्यादा निधी महाराष्ट्रासाठी दिला आहे. रेल्वे, रस्ते आणि हवाई मार्गाद्वारे आर्थिक राजधानी आणि देशाची राजधानी यातील अंतर कमी करण्यात यश आले असून ८ वर्षांत मोदी सरकारने जे करून दाखवले, ते काँग्रेस सरकारला मागील ६० वर्षात जमलेले नसल्याचा टोला ठाकूर यांनी काँग्रेसला लगावला.
-------------------
खासदार संजय राऊतांना टोला
जगात सात आश्चर्ये आहेत, त्यातील दोन दिल्लीत बसले आहेत; तर महाराष्ट्रात दहावे आश्चर्य असून फडणवीस हे दहावे आश्चर्य आहेत, असे वक्तव्य राऊत यांनी केले आहे. यावर मंत्री ठाकूर म्हणाले, त्यांच्या बोलण्यावर कोणी विश्वास ठेवत नाही. यापेक्षा त्यांनी केलेल्या घोटाळ्यांवर चर्चा केली, तर बरे होईल, असा टोला त्यांना खासदार संजय राऊतांना लगावला.