
मेट्रो कामाच्या संरक्षक भिंतींमुळे अपघातांना निमंत्रण
भांडुप, ता. १५ (बातमीदार) ः मेट्रोच्या कामांची गती संथ असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अशातच या मेट्रोच्या कामाभोवती उभारलेल्या संरक्षक भिंती अपघाताला कारणीभूत ठरत असल्याने डोकेदुखी आणखी वाढल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यामुळे हे काम अधिक वेगाने पूर्ण करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
भांडुप पश्चिमेला एलबीएस मार्ग हा वरदळीचा रस्ता म्हणून ओळखला जातो. या रस्त्यावरून घाटकोपरपासून मुलुंडपर्यंत मोठ्या प्रमाणावर गाड्यांची ये-जा सुरू असते. गांधी नगरपासून सोनापूर सिग्नलपर्यंत या मार्गावर गेल्या काही महिन्यांपासून मेट्रो प्रकल्पाचे काम सुरू आहे. त्यामुळे आधीच अरुंद असलेला एलबीएस आणखी आक्रसला आहे. मेट्रोच्या कामामुळे या रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा सामना येथील नागरिकांना करावा लागत आहे. सकाळी घाटकोपर दिशेने जाणारी, तर संध्याकाळी मुलुंड, ठाण्याकडे जाणारी वाहतूक अरुंद एलबीएसवर ठिकठिकाणी तुंबते. विक्रोळीच्या गांधीनगर चौकातून भांडुपच्या सोनापूर चौकात जाण्यासाठी दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत आहे. या कामांचा फटका पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसला आहे. मेट्रोची कामे, गाड्यांची वर्दळ यामधून पायी प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेष म्हणजे मेट्रो प्रकल्पाचे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी रस्त्याच्या मध्यभागी उभारलेल्या संरक्षक भिंतीमुळे या मार्गावर गेल्या काही महिन्यांत अनेक अपघात घडले आहेत. या मार्गाला येऊन मिळणाऱ्या अन्य रस्त्यांवरून येणारी वाहने किंवा रस्ता ओलांडणारे पादचारी संरक्षक भिंतींच्या उंचीमुळे दृष्टीस पडत नाहीत. त्यामुळे हे अपघात होतात, असे स्थानिक वाहतूक पोलिसांनी सांगितले.
मेट्रो कामामुळे गर्दीच्या वेळेत एलबीएस मार्गांवर अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून अशा ठिकाणी वाहतूक पोलिस नेमण्यात यावा.
- संतोष पार्टे, उपाध्यक्ष, मनसे, रस्ते साधन सुविधा व आस्थापना
मेट्रो कामामुळे वाहतूक समस्या वाढत आहेत. नागरिकांनी चालायचे कुठून, हा प्रश्न पडला आहे. यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
- सुभाष गावडे, ज्येष्ठ नागरिक
.......................
एलबीएस मार्गावरील वाहतूक कोंडीमुळे वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे. अरुंद रस्त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
- आकाश गुजर, वाहनचालक