प्रीमियर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रीमियर
प्रीमियर

प्रीमियर

sakal_logo
By

वेबसीरिज

फर्जी

बनावट चलनाचे अस्सल मनोरंजन
पैसा कमावण्यासाठी सर्वच जण कष्ट करत असतात. आपली कमाई आणि महागाई यांचे नेहमीच व्यस्त प्रमाण असल्याने हा अधिकचा पैसा कसा मिळवता येईल, यासाठी सतत आपला आटापिटा सुरू असतो. इतके कष्ट करून आपण कमावलेला पैसा नकली निघाला तर? आपण केलेल्या मेहनतीची किंमत अचानक शून्य झाली तर? नुसती कल्पनाच किती भयावह आहे; पण आजही देशात अनेक ठिकाणी बनावट चलनावर ‘सर्जिकल स्ट्राईक’ सुरू आहे. त्यामुळे ही अतिशयोक्ती नक्कीच नाही. बनावट चलनाच्या याच विषयाला धरून ‘अॅमेझॉन प्राईम’ने ‘फर्जी’ ही नवीन वेबसीरिज प्रेक्षकांसमोर आणली आहे.

‘फर्जी’ म्हणजे मुंबईत राहणारा एक हरहुन्नरी कलाकार सनी (शाहीद कपूर) आणि त्याचा बालमित्र फिरोज (भुवन अरोरा) यांची कथा. दोघांना सनीचे नानाजी माधव (अमोल पालेकर) यांनी लहानाचे मोठे केले आहे. त्यामुळे दोघांसाठी नानाजी त्यांचे सर्वस्व आहेत. नानाजींच्या प्रिंटिंग प्रेस ‘क्रांती’वर जेव्हा जप्तीचे सावट येते तेव्हा प्रेसला आणि मूलतः नानाजींना वाचवण्यासाठी सनी नकली नोटा छापून कर्जाची परतफेड करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखतो. सनीची योजना सफलही होते; पण आता त्याला मागे फिरायचे नसते. आर्थिक परिस्थितीवरून सतत अवहेलना झेलणाऱ्या सनीला झटपट श्रीमंत होण्याचा राजमार्ग गवसलेला असतो. या मार्गावर चालणे किती धोकादायक आहे, हे सनीला त्याच्या आयुष्यात मन्सूर दलालचा (के. के. मेनन) प्रवेश झाल्यावर लक्षात येते. मन्सूरच्या मागावर असणारा बनावट चलनाविरोधातील स्पेशल टास्क फोर्सचा अधिकारी मायकल (विजय सेतुपती) आणि त्याची टीम सनीला जेरबंद करू पाहते. या चक्रव्यूहातून सनी बाहेर पडतो का, हे जाणून घेण्यासाठी ‘फर्जी’ पाहावी लागेल.
राज आणि डीके या दिग्दर्शक द्वयींनी सीरिजचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. याशिवाय सीता मेनन आणि सुमन कुमार यांचेही लेखनात योगदान आहे. पटकथा उत्तम जमून आली आहे. त्यामुळे तब्बल आठ भागांत कथा मांडली असली तरी कुठेही प्रेक्षकांना कंटाळा येत नाही. याचे श्रेय संवादलेखक हुसैन दलाल यांनाही द्यायला हवे. खासकरून सेतुपती आणि मंत्री पवन गहलोत (झाकीर हुसैन) यांची जुगलबंदी खुसखुशीत संवादांनी मजेशीर झाली आहे. शाहीद कपूरने सनीची भूमिका सफाईने सादर केली आहे. चौकस मेघा व्यासच्या भूमिकेत राशी खन्नाने प्रभावित केले आहे; पण भुवन अरोरा याने फिरोजची भूमिका साकारताना या सर्वांवर कडी केली आहे. धसमुसळा, सर्वांना सांभाळून घेणारा, सनीला प्रसंगी सुनावणारा; पण त्याची साथ न सोडणारा एक जिगरी दोस्त भुवनने उत्कृष्ट उभा केला आहे. याशिवाय दिग्गज अभिनेते के. के. मेनन आणि सेतुपती यांची अभिनयातील चमकदार कामगिरी या सीरिजमध्येही पाहायला मिळते. सुरुवातीला कानांना खुपणारे सेतुपती याचे हिंदी संवाद नंतर कधी मधाळ वाटू लागतात हे आपल्या लक्षातही येत नाही. बऱ्याच वर्षांनी पडद्यावर दिसणाऱ्या अमोल पालेकर यांचा सहज वावरही सुखावह वाटतो. सायराच्या लहानशा भूमिकेत कुब्रा सैत लक्षात राहते. बनावट चलनाचे दुष्परिणाम दाखवण्यात मात्र सीरिज कमी पडते. सामान्य जनतेला खऱ्या आणि खोट्या चलनातील फरक सहज लक्षात येण्यासारखा नसल्याने त्यांच्या आयुष्यात घडू शकणाऱ्या घातक परिणामांकडे सीरिज सोयीस्कर डोळेझाक करते.
पंकज कुमार यांच्या छायाचित्रणाने मुंबईतील गल्ली-बोळ जिवंत केल्या आहेत. काही महत्त्वाची अॅक्शन दृश्ये इथल्या गर्दीतही सफाईदारपणे चित्रित झालेली आहेत. अस्सल मुंबई दाखवणारी लोकेशन्स या सीरिजच्या निमित्ताने बघायला मिळतात. एकूणच तांत्रिक अंगाने सीरिजची कामगिरी प्रभावी आहे.
राज आणि डीके यांचा ‘फॅमिली मॅन’ आधीच प्रेक्षकांचा लाडका आहे. त्यात आता ‘फर्जी’ची भर पडली आहे. इथून पुढेही हे दोघे या सीरिजला कसे पुढे घेऊन जातात याबद्दल उत्सुकता राहील. तूर्तास ‘फर्जी’चा पहिला सिझन ‘अॅमेझॉन प्राईम’वर पाहता येईल.

- युवराज माने