‘शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी पदांची नियुक्ती शिक्षकांमधूनच व्हावी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी पदांची नियुक्ती शिक्षकांमधूनच व्हावी’
‘शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी पदांची नियुक्ती शिक्षकांमधूनच व्हावी’

‘शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी पदांची नियुक्ती शिक्षकांमधूनच व्हावी’

sakal_logo
By

मुंबई, ता. १५ (बातमीदार) ः महाराष्ट्रात १९८३ पासून २०२० पर्यंत शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व शिक्षण विभागातील अनेक पदांवर शिक्षक म्हणून प्रथम नियुक्ती मिळालेले अनेक अधिकारी कार्यरत आहे; परंतु अलीकडच्या काळात ही पदे सर्वसामान्यांना खुली केल्यामुळे शिक्षकांचे अधिकारी बनण्याचे स्वप्न भंगले होते. या गंभीर विषयाची दखल घेत भाजप शिक्षक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल बोरनारे यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदनाद्वारे ही पदे शिक्षकांमधूनच स्पर्धा परीक्षेद्वारे भरण्यात यावीत, अशी मागणी केली आहे.
महाराष्ट्रात शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदे ही अध्यापनाचा पाच वर्षांचा अनुभव व बी.एड., एम. एड. ही पदवी प्राप्त असणाऱ्या सेवेतील शिक्षकांमधूनच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत स्पर्धा परीक्षा घेऊन भरण्यात येत होती; परंतु अलीकडच्या काळात कोणत्याही पदवीधर उमेदवाराला महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर नियुक्ती मिळत आहे. यामुळे संबंधित पदवीधर उमेदवारांना अध्यापनाचा कोणताही अनुभव व बी.एड. नसल्यामुळे अधिकारी झाल्यानंतर विद्यार्थ्यांची गुणवत्ता, शाळांची गुणवत्ता, अध्यापनाच्या पद्धती, शाळा तपासणी, विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मुख्याध्यापक व शालेय कामकाजाशी संबंधित यथोचित माहितीचा अभाव आढळून आला आहे.
या नवीन व फक्त पदवीधर असलेल्या अधिकाऱ्यांना शालेय कामकाजाचा अनुभव कमी असल्यामुळे राज्यातील शालेय व्यवस्थेला व शैक्षणिक प्रशासनाला भविष्यात अनेक अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे मत अनिल बोरनारे यांनी व्यक्त केले. त्यामुळे पुढील काळात राज्यातील शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी व तत्सम पदांवर पात्र शिक्षकांचीच स्पर्धा परीक्षा मार्फत पूर्वीप्रमाणे नियुक्ती करण्याचा शासन निर्णय निर्गमित करावा, अशी मागणी अनिल बोरनारे यांनी केली आहे.