
बेवासर वाहनांमुळे अग्निधोका
नेरूळ, ता. १५ (बातमीदार)ः नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या बेवारस रिक्षांना मंगळवारी दुपारी आग लागण्याची घटना घडली होती. या घटनेत पाच रिक्षा जळून खाक झाल्या असल्याने रेल्वे स्थानकांबाहेरील उभ्या असलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
नेरूळ रेल्वे स्थानकातील पार्किंगमध्ये शेकडो रिक्षा बेवारसपणे उभ्या आहेत. यापैकी नेरूळ रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला रेल्वे रुळालगत असलेल्या रिक्षांना मंगळवारी दुपारी अचानक आग लागली होती. या घटनेत पाच रिक्षा खाक झाल्या. या वेळी नागरिकांच्या सतर्कतेमुळे तातडीने अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, या घटनेने नवी मुंबईतील सर्वच रेल्वे स्थानकांच्या पार्किंगमध्ये वर्षानुवर्षे उभ्या असलेल्या बेवारस वाहनांचा प्रश्न अधोरेखित झाला आहे. विशेष म्हणजे, या प्रश्नाकडे सिडको प्रशासनाचे नेहमीच दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे शहरातील सर्वच स्थानक परिसरामध्ये बेवारस वाहनांसह गर्दुल्ले, भिकाऱ्यांचा वाढलेला वावर हीदेखील समस्या आहे. या गर्दुल्ल्यांकडून प्रवाशांना त्रास देण्याचे प्रकारही होत आहेत. त्यामुळे स्थानकांमधील या समस्या सोडवण्याबाबत प्रशासकीय यंत्रणांची अनास्था प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत आहे.
--------------------------
गुन्हेगारांकडून वापराची शक्यता
नवी मुंबई शहरात अनेक वाहने रस्त्यावर धूळखात पडलेली असताना सिडकोचे वाहनतळदेखील यातून सुटलेली नसल्याचे दिसून येत आहे. वर्षानुवर्षे धूळखात पडलेल्या या वाहनांचा व त्यांच्या नंबर प्लेटचा वापर गुन्हेगारांकडून वापर होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच बँकांकडून अनेक वेळा कर्ज घेऊन हप्ते थकलेल्या रिक्षा सार्वजनिक जागेत उभी केली जात आहेत. त्यामुळे शासकीय जागेचा फुकटात वापर केला जात असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी सिडकोसोबत मोहीम राबवण्याची गरज आहे.
--------------------------------------
अधिकाऱ्यांचा सुस्तपणा अपघाताला निमित्त
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी नुकतीच नेरूळ रेल्वे स्थानक व कोपरखैरणे रेल्वे स्थानकाचा पाहणी दौरा केला होता. या दौऱ्यात नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या तातडीने सोडवण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले होते. मात्र, असे असताना स्थानकातील पार्किंगमध्ये ठेवलेल्या बेवारस वाहनांबद्दल कोणताही निर्णय घेण्यात आला नसल्याने अधिकाऱ्यांचा सुस्तपणा मोठ्या अपघाताला निमित्त ठरत आहे.
------------------------------------------
कोविडकाळात अनेकांनी ही वाहने ठेवलेली आहेत. ते पुन्हा घेण्यासाठी आलेले नाहीत. त्याव्यतिरिक्तदेखील अशी अनेक वाहने सिडकोच्या पार्किंगमध्ये पडलेली दिसून येत होती. याबाबत नवी मुंबई पोलिसांनी पालिका, सिडकोकडे चौकशी करणे गरजेचे आहे.
- विजय घाटे, अध्यक्ष, नेरूळ स्टेशन कॉम्प्लेक्स असोसिएशन