
कल्याणमध्ये एसटी चालकास मारहाण
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १५ : कल्याणमधून भिवंडीच्या दिशेने जात असलेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या विठाई बस चालकाला दोन दुचाकीस्वरांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. दुचाकी चालकाला पुढे जाण्यासाठी जागा देत नाही यावरून तरुणांनी चालकास मारहाण केली आहे. याप्रकरणी बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महेंद्र पाटील (वय ३९), शंकर पाटील (वय ३५) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल दराडे (वय ४२) असे जखमी झालेल्या एसटी बसचालकाचे नाव आहे. विठ्ठल दराडे आपल्या ताब्यातील विठाई बस प्रवाशांसह घेऊन सोमवारी (ता. १३) दुपारी कल्याण आगारातून भिवंडीच्या दिशेने निघाले होते. या बसच्या पाठीमागे आरोपी महेंद्र, शंकर हे दुचाकीवरून चालले होते. लालचौकी येथे प्रवासी उतरण्यासाठी चालक विठ्ठल यांनी बस रस्त्याच्या बाजुला घेतली. त्यावेळी बसच्या पाठीमागून येत असलेल्या आरोपींनी दुचाकी बसच्या पुढे उभे करून चालक विठ्ठल यांना बस कशी चालवायची, कुठे उभी करायची हे तुला कळते का? असे प्रश्न करून शिवीगाळ केली. त्यांना लोखंडी सळई, हेल्मेटच्या साहाय्याने बेदम मारहाण केली. शिवाय धमकी देऊन दोघांनी घटनास्थळावरून पळ काढला. सरकारी कामात अडथळा म्हणून चालक विठ्ठल यांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी मारेकऱ्यांचा तपास सुरू केला आहे.