
प्रेम आणि सेवा ही जगातील सर्वात मोठी देणं : विश्वास नांगरे पाटील
प्रेम आणि सेवा जगातील सर्वात मोठे देणे!
विश्वास नांगरे पाटील यांचे प्रतिपादन; महाराष्ट्र आयकॉन पुरस्काराचे वितरण
घाटकोपर, ता. १६ (बातमीदार) ः प्रेम आणि सेवा हे जगातील सर्वात मोठे देणे आहे. त्यावरच समाज आणि जग एकमेकांना जोडले जाते, असे प्रतिपादन लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलिस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी मुंबईत केले. मंगळवारी (ता. १४) प्रभादेवीतील रवींद्र नाट्यमंदिरात राज्यातील विविध क्षेत्रांतील दहा निवडक मान्यवरांना ‘ऑलवेज हेल्पिंग हॅण्ड’ फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र आयकॉन पुरस्कार २०२३ ने सन्मानित करण्यात आले. त्या वेळी नांगरे पाटील बोलत होते. त्यांच्यासह उद्योगमंत्री उदय सामंत आणि आयोजिका सारिका घार्गे (कदम) यांच्या हस्ते विविध मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात आले.
उपस्थितांना मार्गदर्शन करताना विश्वास नांगरे पाटील यांनी ‘ऑलवेज हेल्पिंग हॅण्ड’तर्फे दिव्यांगासाठी होत असलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या. या संस्थेचा सामाजिक संदेश सर्वांनी अंगीकारण्याची गरज असून सरकारही त्यांचे कौतुक करत त्यांना मदत मिळवून देऊ शकते, असे ते म्हणाले. कार्यक्रमात पोलिस उपायुक्त शिवराज पाटील, काँग्रेसचे नाशिक शहर अध्यक्ष आकाश छाजेड आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुरस्कार सोहळ्यात पद्मश्री डॉक्टर-उद्योजिका कल्पना जगत, पत्रकारितेसाठी आशीष जाधव, मळगंगा अंध अपंग सेवा संस्था समाजसेविका जाई उत्तम खामकर, अभिनेत्री किशोरी शहाणे, क्रीडा क्षेत्र वैष्णवी बाला मोरे, अभिनेता किरण माने, मुख्याध्यापिका भाग्यश्री वर्तक, वैद्यकीय क्षेत्र डॉ. धनीश विनोद मेहंदीरत्ता, रोटरी क्लब ऑफ महाकाली अंधेरी आदींना महाराष्ट्र आयकॉन २०२३ ने सन्मानित करण्यात आले. सोहळ्यात उदय साटम यांचा ‘मराठी पाऊल पडते पुढे’ हा मनोरंजनाचा कार्यक्रम पार पडला.
सारिका घार्गे (कदम) म्हणाल्या, की दिव्यांगांच्या उन्नतीसाठी आणि त्यांना थोडा हातभार लागावा या उद्देशाने सोहळा सुरू करण्यात आला आहे. त्याला आज सर्वच क्षेत्रातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. पुरस्कारासाठी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करण्यात आली.