सहाय्यक आयुक्त हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सहाय्यक आयुक्त हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल
सहाय्यक आयुक्त हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

सहाय्यक आयुक्त हल्ल्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल

sakal_logo
By

सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : ठाणे पालिकेच्या अतिक्रमण विभागाचे सहायक आयुक्त महेश आहेर यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह सात जणांविरुद्ध नौपाडा पोलिस ठाण्यात बुधवारी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
रात्री उशिरा ४ जणांना अटक करण्यात आली. आरोपींना गुरुवारी न्यायालयात नेले असता न्यायालयाने त्यांना एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे. या हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या आरोपींमध्ये अभिजित पवार, हेमंत वाणी, विक्रम खामकर, विशांत गायकवाड यांचा समावेश असून त्यांना शुक्रवारी पुन्हा न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या हल्ल्यानंतर जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या आहेर यांनी नौापाडा पोलिसांकडे याप्रकरणी तक्रार दिली होती. दरम्यान, घटनास्थळी सहपोलिस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलिस उपायुक्त गणेश गावडे आणि वरिष्ठ पोलिस निरीक्षक संजय धुमाळ आदींनी भेट देत पाहणी केली.

------
राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक
राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली. मात्र, अद्यापही आहेर यांची ऑडिओ क्लिप देऊनही त्यांच्याविरोधात गुन्हा का दाखल करण्यात आला नाही, असा सवाल राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आनंद परांजपे यांनी उपस्थित केला. आव्हाड यांच्यावर वारंवार खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पोलिसांनी या प्रकरणी योग्य न्याय करावा, अशी मागणी परांजपे यांनी केली आहे.

आहेर यांची शैक्षणिक पात्रता खोटी : जितेंद्र आव्हाड
आहेर यांची शैक्षणिक पात्रता खोटी आहे. या महापालिकेत वशीला असला, तर फक्त आयुक्त होता येत नाही, मात्र इतर कोणतेही पदे भुषवता येतात, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी केला. कथित ऑडिओमध्ये मी दिवसाला ४० लाख आणतो आणि २० लाख वाटतो, महापालिका म्हणजे कुबेराचा खजिना आहे का? ऑडिओमधील बाबाजी म्हणजे सुभाष सिंग ठाकूर आहे. त्यामुळे त्याची चौकशी लावली, तर सर्व सत्य समोर येईल, असे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले. सोबतच महापालिका आयुक्त किंवा पोलिस यात काही करू शकत नाहीत, ते हतबल आहेत, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले. दुसरीकडे सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून या व्हिडीओत महेश आहेर यांच्या कार्यालयातील कर्मचारी पैसे मोजत असल्याचे दिसत आहे.


...................................
तो आवाज माझा नाही : ती क्लिप काय आहे, हे मला माहीत नाही; परंतु त्यातील आवाज माझा नाही. २०१९ पासून मी मुंब्य्राचा सहायक आयुक्त होतो, तेव्हा मी येथील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करीत होतो. तेव्हापासून मला मारण्याचा कट केला जात होता. मला काही लोकांकडून धमक्या येत होत्या. आव्हाड यांच्याशी बोलण्यास आम्ही घाबरतो. कारण ते संभाषण टेप करून व्हायरल करतात. ते सांगतील तशा कारवाया कराव्या लागत होत्या. माझ्या मतदारसंघात मी सांगेन तसेच झाले पाहिजे. मला आणि माझ्या कुटुंबाला आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांकडून धोका आहे.
- महेश आहेर, सहायक आयुक्त, अतिक्रमण विभाग

अशा घटना घडणार असतील, तर ते चुकीचे आहे; मात्र जोपर्यंत चौकशी होणार असेल, तर तोपर्यंत महेश आहेरला निलंबित करावे. आमच्या कुटुंबाला धमकावले गेले आहे. बाबाजी कोण आहे, हे पोलिसांनी तपासले पाहिजे. महेश आहेर हे यापूर्वीदेखील धमक्या देत होते. मुख्यमंत्र्यांना मी हेच सांगू इच्छिते, की आता बस करा, खूप झाले. पोलिसांना विनंती आहे, की या ऑडिओ क्लिपचा योग्य तो तपास करावा.
- ऋता आव्हाड

---------------
आहेर यांच्यावर कारवाई व्हावी : ठाणे शहर काँग्रेस
राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महेश आहेर यांच्याबाबत जे काही वक्तव्य केले आहे, त्याची सत्यता तपासली गेली पाहिजे. तसेच आहेर यांना पाठीशी घालणाऱ्यांचा शोध घेऊन आहेर यांच्यासह त्यांच्यावरदेखील कारवाई करावी, अशी मागणी ठाणे शहर काँग्रेसच्या वतीने प्रवक्ते सचिन शिंदे आणि राहुल पिंगळे यांनी केली आहे.