
प्रथमच आग्रा किल्ल्यात साजरी होणार शिवजयंती
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १६ : मराठेशाहीच्या इतिहासात मोठे महत्त्व असलेल्या आग्र्याच्या किल्ल्यात शिवजयंती उत्सव साजरा करण्यास परवानगी दिल्याबद्दल भारतीय जनता पार्टीचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचे अभिनंदन केले आहे. हा उत्सव साजरा व्हावा, यासाठी सातत्याने प्रयत्न केल्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचेही डावखरे यांनी आभार मानले. या वेळी आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितले की, मराठेशाहीच्या इतिहासात आग्रा येथील किल्ल्याला मोठे महत्त्व आहे. शिवछत्रपतींनी याच किल्ल्यातील ‘दिवाण-ए- आम’मध्ये औरंगजेबासमोर बाणेदारपणाचे दर्शन घडवले होते. यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने ‘दिवाण-ए- आम’ निनादणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ३९३ वी जयंती यावर्षी साजरी होत आहे. यानिमित्ताने हा मोठा योग महाराष्ट्र सरकार आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. हिंदवी स्वराज्याचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांचा जयंती उत्सव आग्रा किल्ल्यात साजरा होणे, हा समस्त मराठी जनतेच्या दृष्टीने अभिमानाचा क्षण आहे. दरम्यान, राज्यात शिवनेरी किल्ल्यावर होणाऱ्या शिवजयंती उत्सवाला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित राहणार आहेत. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कल्पनेतून साकारलेल्या पुणे येथील शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे, अशी माहितीही आमदार डावखरे यांनी दिली.