
इलेक्ट्रिक बसमधून १० रुपयात गारेगार प्रवास
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १७ : ठाणे परिवहन विभागाच्या ताफ्यात लवकरच इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. मात्र अन्य महापालिकांच्या परिवहन विभागांबरोबरच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी इलेक्ट्रिक वातानुकूलित बस सेवेचे प्रवास भाडे कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भातील प्रस्ताव शुक्रवारी (ता. १७) परिवहन समितीच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. त्यामुळे आता ठाणेकर प्रवाशांना किमान १० रुपयांत एसी बसचा गारेगार प्रवास करता येणार आहे.
ठाणे परिवहनच्या ताफ्यात लवकरच १२३ इलेक्ट्रिक बस दाखल होणार आहेत. ४५ स्टॅण्डर्ड बस व २६ मिडी बस अशा एकूण ७१ बस वातानुकूलित, तसेच १० स्टॅण्डर्ड व ४२ मिडी बस अशा एकूण ५२ साध्या बस उपलब्ध होणार आहेत. यातील वातानुकूलित २६ मिडी बस शहरातंर्गत व उर्वरित ४५ स्टॅण्डर्ड बसपैकी काही बस ठाणे शहराबाहेरील दीर्घ पल्ल्याच्या मार्गावर घाटकोपर, बोरिवली, नवी मुंबई, पनवेल आदी मार्गावर चालवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ठाणे शहरात बेस्टमार्फत चालवण्यात येणाऱ्या बसचे तिकीट दर कमी आहेत. बेस्ट व नवी मुंबई परिवहनच्या वातानुकूलित बसचे तिकीट दरही कमी आहेत. त्या उपक्रमांशी स्पर्धा करावयाची झाल्यास अधिकाधिक प्रवासी उत्पन्न प्राप्त करणे गरजेचे आहे. त्यानुसार ठाणे परिवहन विभागाने इलेक्ट्रिक बस परिवहनच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर त्याचे तिकीट दर हे कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय परिवहन समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार पहिल्या टप्प्याचे भाडे (इलेक्ट्रिक वातानुकूलित बसचे) १० रुपये प्रस्तावित करण्यात आले आहे. यापूर्वी २० रुपये मोजावे लागत होते. तसेच बोरिवलीपर्यंतचे भाडे ८५ ऐवजी ५० रुपये असणार आहे.