नाल्यामधील बेवारस टायगर विदेशात रवाना
दिनेश गोगी, उल्हासनगर
पिशवीत बांधून नाल्यात टाकण्यात आलेल्या संवेदनशील दांपत्याकडून जीवनदान मिळालेल्या उल्हासनगरातील बेवारस ‘टायगर’ला विदेशातील इटली मधील दाम्पत्याने दत्तक घेतले आहे. दत्तक घेण्याची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यावर टायगर त्याच्या नवीन आईवडिलांसोबत इटलीसाठी रवाना झाला आहे. त्याला जीवनदान देणाऱ्या दाम्पत्याने साश्रूनयनांनी त्याला निरोप दिला, तेव्हा टायगरला मुलगा म्हणून इटलीत नेणाऱ्या दाम्पत्यानेही पाणावलेल्या डोळ्यांनी त्यांचे आभार मानले आहेत.
टाकण्यात आलेल्या पिशवीतून वडोल गावात ३० डिसेंबर २०१८ ला एका नाल्यात पडलेल्या एका पिशवीतून नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. नागरिकांनी पिशवी बाहेर काढली, तेव्हा त्यात असलेल्या अर्भकाच्या नाका तोंडात गटाराचे पाणी गेल्याने त्याला श्वास घेता येत नव्हता. अशात अशोका फाऊंडेशनचे शिवाजी रगडे त्यांची पत्नी जयश्री रगडे यांनी त्याला तत्काळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. पुढे त्याला दुर्धर आजाराचे निदान झाल्यावर रगडे दांपत्याने त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले. या अर्भकाची प्रकृती सुधारू लागल्यावर रगडे दांपत्याने त्याचे टायगर असे नामकरण केले. त्यामुळे टायगर कमालीचा प्रकाशझोतात आला.
पण टायगरच्या मेंदूला दुखापत असल्याने त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार असल्याची माहिती डॉक्टरांनी रगडे यांना दिली. या शस्त्रक्रियेची सुविधा मुंबईतील वाडिया हॉस्पिटलमध्ये असल्याचे समजल्यावर शिवाजी रगडे यांनी हॉस्पिटलशी संपर्क साधला. पण बेड उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आल्यावर रगडे यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना सांगितले. डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रयत्नाने बेड उपलब्ध झाला, पण त्यासाठी १० लाख रुपये खर्च येणार होता. अशावेळी केटो फंड एनजीओने रगडे यांच्या हाकेला साथ दिली आणि टायगरच्या मेंदूवर दोन यशस्वी शस्रक्रिया करण्यात आल्या. वाडिया हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यावर तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी त्यांच्या ठाणे निवासस्थानी टायगरचे स्वागत करून टायगरला जीवनदान देण्यासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या रगडे दाम्पत्यालाही शाबासकी दिली.
...
दत्तक घेण्याची प्रक्रिया पूर्ण
टायगर बेवारस असल्याने त्याला नेरुळ मधील विश्व बालक केंद्रात ठेवण्यात आले. टायगरला दत्तक घेण्यासाठी असंख्य अर्ज आले. पण अटी शर्तीत ते बसले नाहीत. इटलीमधील दाम्पत्याने दत्तक प्रक्रियेच्या अटी शर्तीची प्रक्रिया पूर्ण केल्यावर विश्व बालक केंद्राने टायगरला त्यांच्या सुपूर्द केले. आणि टायगर विदेशातील नागरिकत्व स्वीकारण्यासाठी नविन आईवडिलांसोबत इटलीकडे रवाना झाला. यावेळी टायगरला निरोप देण्यासाठी उल्हासनगरातील त्याचे जीवनदाते शिवाजी रगडे, जयश्री रगडे आणि कायद्याने वागा लोकचळवळचे राज असरोंडकर उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.