
पारसिक नगरमध्ये मुलींसाठी संगणक केंद्र
कळवा, ता. १८ (बातमीदार) : ठाण्यातील कॉज फाऊंडेशनच्या वतीने कळव्यातील पारसिक नगर भागात मुलींसाठी मोफत संगणक प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आले. या केंद्राचे उद्घाटन मिसेस इंडिया आणि मिसेस क्वीन ऑफ द वर्ल्ड २०२२ प्रियांका बजाज सिबल, एक्सेनचरचे संचालक सिबल, कॉज फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापिका कल्पना मोरे, अध्यक्ष जितेश मोरे, उद्योगपती नंदकुमार साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. आमच्या संस्थेची ही पहिली पायरी असून यामध्ये मुलींना मोफत संगणक प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी आधुनिक संगणकाचीदेखील साथ असणार आहे. समाजात महिला वावरताना त्यांना मोकळेपणाने जगता आले पाहिजेत हा संस्थेचा उद्देश असल्याचे कल्पना मोरे यांनी सांगितले. कॉजचे संस्थापक जितेश मोरे यांनी मान्यवरांचे आभार मानले. कार्यक्रमाला ठाणे महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी व महिला व बालकल्याणच्या उपायुक्त वर्षा दीक्षित तसेच ठाणे महानगरपालिकेचे नगर रचनाकार मिलिंद पाटील व डॉ. वृषाली पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.