
स्पर्श अभियानातून कुष्ठरोग जनजागृती
कासा, ता. १८ (बातमीदार) : डहाणू येथे कुष्ठरोग सहाय्यक संचालक, पालघर यांच्या मार्गदर्शनखाली उपजिल्हा रुग्णालय डहाणू व तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती डहाणू यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्श अभियानातून कुष्ठरोग जनजागृती करण्यात आली. या निमित्ताने डहाणूच्या श्री बाबुभाई पोंदा ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने पार नाका ते उपजिल्हा रुग्णालय व आगर परिसरात रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सर्वप्रथम विद्यार्थ्यांना कुष्ठरोगबाबत शपथ देण्यात आली. कुष्ठरोगाबाबत समज-गैरसमज समजावून सांगण्यात आले. कुष्ठरोग लक्षणे दिसल्यास लगेच संपर्क साधून औषध सुरू केल्यास कुष्ठरोग बरा होऊ शकतो, असे सांगण्यात आले. या नंतर बॅनर्स, फ्लेक्स व माईकिंगसाठी घंटागाडीच्या साहाय्याने सर्व लोकांना कुष्ठरोगबाबत जनजागृती करण्यात आली. या रॅलीसाठी पोंदा कॉलेजचे प्राचार्य व शिक्षक तसेच उपजिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर व कर्मचारी आणि तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयाचे सर्व कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले. कुष्ठरोग तंत्रज्ञ प्रभाकर कांबळे, उमेश साळुंके व रोहीत वाढू यांनी रॅलीसाठी विशेष प्रयत्न केले.