
ई-टॉयलेटच्या संकल्पनेला टाळे
वाशी, ता.१८(बातमीदार) ः नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील विविध १५ ठिकाणी प्रत्येकी सुमारे ९ लाख खर्चून ई-टॉयलेट बांधण्यात आले होते. त्यात तीन टॉयलेट खास महिलांसाठी होते. मात्र, या ई-टॉयलेटची साफसफाई होत नसल्याने ही संकल्पना वापराविना बंद पडली आहे. त्यामुळे आता या ठिकाणी पारंपरिक शौचालये बांधण्यासाठी अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे.
नवी मुंबई शहरातील पाम बीच, ठाणे-बेलापूर, शीव-पनवेल मार्गावर तसेच एमआयडीसीत बांधण्यात आलेल्या ई-टॉयलेटच्या वापरावेळी नागरिकांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे सध्या शहरातील जवळपास सर्वच ई-टॉयलेट धूळ खात पडून आहेत. शुक्रवारी मनपाचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. या वेळी ई-टॉयलेट बाबत विचारणा केली असता मनपा आयुक्त राजेश नार्वेकर यांनी या उपक्रमाला अपेक्षित यश मिळाले नसल्याने हा उपक्रम बंद करण्यात येत असल्याची माहिती दिली. तसेच नागरिकांची अडचण लक्षात घेता या सर्व ठिकाणी पारंपरिक सार्वजनिक शौचालय बांधण्यात येणार असल्याची माहिती देखील त्यांनी दिली.