
निंबापूरवासियांचा खडकातून प्रवास
कासा, ता. १८ (बातमीदार) : डहाणू तालुक्यातील कासा-उधवा राज्य मार्गावरील सायवनजवळील तीन किलोमीटर अंतरावर निंबापूर हे गाव असून तेथे जाण्यासाठी अजूनही मजबूत रस्ता नसल्याने प्रवाशांसह वाहनचालकांचे हाल होते आहेत. गेल्या दहा ते बारा वर्षांपासून हा रस्ता खड्डेमय झाला आहे. खडी बाहेर आल्याने या रस्त्यावरुन चालणेही अवघड झाले आहे.
निंबापूर गावात जाणारा रस्ता खराब झाल्यामुळे गावात रिक्षासुद्धा नेता येत नाही, अशी अवस्था झाली आहे. गावातील एक ते दीड किलोमीटर रस्ता खराब झाल्याने येथील नागरिकांना बाजारपेठेत किंवा रुग्णालयात जाण्यासाठी तसेच शालेय मुलांना शाळेत जाण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय येथून पायी प्रवास करत जावे लागते. या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी अनेकवेळा शासन दरबारी मागणी केली असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. सध्या गावात जलजीवन मिशनअंतर्गत काम सुरू असून त्यासाठी रस्त्यावर पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू असल्याने रस्ता आणखी खराब झाला आहे. तो लवकरात दुरुस्त करावा, अशी ग्रामस्थ मागणी करीत आहेत.
--------------------
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे मागणी केली. फक्त आश्वासन मिळते. येत्या मे महिन्यापर्यंत हा रस्ता दुरुस्त केला नाही, तर आंदोलन केले जाईल.
- प्रदीप चौरे, ग्रामस्थ, निंबापूर-भोये पाडा
-----------------
रस्त्याच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे, जिल्हा परिषदकडे मागणी केली आहे. लवकरात लवकर हा रस्ता दुरुस्त करण्याचा प्रयत्न करत आहोत. गेल्या अनेक वर्षांपासून या रस्त्याची समस्या आहे.
- रमेश बोरसा, सरपंच, निंबापूर