हरहर महादेवचा गजर दुमदुमला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हरहर महादेवचा गजर दुमदुमला
हरहर महादेवचा गजर दुमदुमला

हरहर महादेवचा गजर दुमदुमला

sakal_logo
By

अंबरनाथ, ता. १८ (बातमीदार) : महाशिवरात्रीच्या निमित्ताने अंबरनाथला शनिवारी (ता. १८) प्राचीन शिवमंदिरात महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांची अभूतपूर्व गर्दी झाली होती. दरवर्षी महाशिवरात्रीच्या निमित्ताने जिल्ह्याच्या विविध ठिकाणांहून शिवमंदिरात शंकराच्या दर्शनासाठी भाविक या ठिकाणी येतात. कोरोनाच्या संकटकाळामुळे मंदिर बंद असल्याने दोन वर्षे महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ठिकाणी मज्जाव करण्यात आला होता. यावर्षी मात्र दर वेळेप्रमाणे शिवमंदिरात दर्शनासाठी आणि त्यानिमित्त भरणाऱ्या यात्रेसाठी एकच गर्दी झाली होती.
मध्यरात्री मंदिर व्यवस्थापनाच्या पुजाऱ्यांनी महादेवाची विधिवत पूजा केली आणि त्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करून देण्यात आले. उल्हासनगरच्या बाजूने येणाऱ्या मार्गातून भाविकांना मंदिरात प्रवेश देण्याची सोय करण्यात आली होती. मंदिरात दर्शन घेतल्यानंतर भाविकांना वालधुनी नदीच्या पुलावरून अंबरनाथच्या दिशेकडून बाहेर जाण्याची व्यवस्था करण्यात आली होती. दर्शन घेतल्यानंतर भाविकांनी जास्त वेळ मंदिर परिसरात थांबू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत होते. त्यामुळे मंदिर परिसरात फक्त दर्शनासाठी रांगेत उभ्या असणाऱ्यांची गर्दी दिसून येत होती.
खेर विभागातील स्वामी समर्थ चौकातून शिवमंदिराकडे जाणाऱ्या तसेच उल्हासनगरच्या कैलास कॉलनीपासून शिवमंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून फक्त नागरिकांना मुभा देण्यात आली होती. सर्व प्रकारच्या वाहनांना बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे शिवमंदिरकडे जाणारे रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते. मंदिर परिसरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी मंडप घालण्यात आला होता. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी मेटल डिटेकटरमधूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश दिला जात होता.