
ठाण्यात अंगणवाडी सेविका काढणा पदयात्रा
सकाळ वृत्तसेवा
ठाणे, ता. १९ : राज्यभरातील अंगणवाडी कर्मचारी सोमवारपासून (ता. २०) बेमुदत संपावर जाणार आहेत. यात ठाण्यातील अंगणवाडी सेविकाही मोठ्या प्रमाणात संपावर जात आहेत. शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या, दरमहा अर्ध्या पगाराएवढी पेन्शन द्या, मानधनवाढीच्या आश्वासनांची पूर्तता करा, सुसज्ज अंगणवाडी केंद्रे द्या, कार्यक्षम मोबाईल द्या या आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, महाराष्ट्र शासनाचे या बाबींकडे लक्ष वेधण्यासाठी ठाणे जिल्ह्यांतील अंगणवाडी कर्मचारी २२ फेब्रुवारीपासून २४ फेब्रुवारीपर्यंत शहापूर ते ठाणे मुख्यमंत्र्यांच्या कक्ष कार्यालयापर्यंत पदयात्रा काढणार आहेत; तर २४ फेब्रुवारी रोजी ठाणे परिसरातील अंगणवाडी कर्मचारी दुपारी १ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करणार आहेत. अंगणवाडी केंद्रामध्ये ६ महिने ते ६ वर्षे या वयोगटातील लहान मुलांना ८ रुपयांचा पूरक पोषण आहार २०१८ पासून दिला जातो. २०१८ नंतर आजपर्यंत जीवनावश्यक वस्तूंचे भाव दुपटीने वाढले. त्यामुळे बालकांना द्यावयाच्या आहाराच्या रकमेमध्ये दुपटीने वाढ करा, अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची व पालकांची मागणी आहे. त्यामुळे बालमृत्यूचे व कुपोषणाचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल.या मागण्यांसह १२ जानेवारी रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व महिला व बालविकास मंत्री यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात भरीव स्वरूपाची वाढ करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, अद्यापही शासनाने या आश्वासनाची पूर्तता केली नाही. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृति समितीच्या वतीने बेमुदत संप सुरू करण्यात येणार आहे.
-------------
बालकांना ताजा आहार द्या
अंगणवाडी केंद्रांना पुरवला जाणार टीएचआर निकृष्ट दर्जाचा असतो. हा आहार बालके खात नाहीत. त्यामुळे तो टाकून द्यावा लागतो. म्हणून बालकांना टीएचआरऐवजी गरम, ताजा आहार देण्यात यावा, अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.