
ठाकरे तलावाचे प्रवेशद्वार निखळले
सकाळ वृत्तसेवा
डोंबिवली, ता. १९ : कल्याणमधील काळा तलावाचे प्रबोधनकार ठाकरे नामकरण करण्यात आले असून बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमा दरम्यान तलावाच्या प्रवेशद्वाराचे कपलिंग तुटल्याची घटना घडली आहे. सकाळी ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आल्यानंतर त्याचे फोटो समाज माध्यमावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन झाल्यानंतर लगेचच प्रवेशद्वार तुटल्याने अनेक नागरिकांनी कामाविषयी नाराजी व्यक्त केली. प्रवाशांचा भार अधिक झाल्याने प्रवेशद्वाराचे कपलिगं तुटले असून त्याची दुरुस्ती करण्यात येत असल्याचे पालिका प्रशासनाच्या वतीने यावेळी सांगण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कल्याणमधील काळा तलावाचे सुशोभिकरण करण्यात आले आहे. प्रबोधनकार ठाकरे असे या तलावाचे नामकरण करण्यात आले आहे. याचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन होऊन बारा तासही उलटत नाही तोच तलावाचे प्रवेशद्वार तुटले असल्याची बाब काही नागरिकांच्या लक्षात आली. प्रवेशद्वार तुटल्याचे फोटो समाज माध्यमावर व्हायरल झाले. १९.७६ कोटी रुपये खर्च करुन सुशोभिकरण करण्यात आलेल्या या तलावाचे मुख्य प्रवेशद्वार तुटल्याने अनेक नागरिकांनी त्याविषयी नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या कामाच्या दर्जावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले आहे.
-----------------------
मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनादेखील जमाव आवरने शक्य झाले नाही. जमाव अधिक असल्याने प्रवेशद्वार उघडल्यानंतर त्याला जोरात ढकलले गेले. दरम्यान त्याचे कपलिंग तुटले. कामाचा दर्जा निकृष्ट नाही आहे. कन्सल्टंट यांच्याकडून तपासणी करण्यात आली असून त्याचे रिपोर्ट आपल्याकडे आहेत.
प्रल्हाद रोडे, प्रकल्प अधिकारी, स्मार्ट सिटी