
‘बांधकाम व्यवसायातील आव्हानांसाठी व्यवस्थापन प्रशिक्षण गरजेचे’
मुंबई, ता. १९ ः कोरोना कालखंडानंतर बांधकाम क्षेत्रासमोर आलेल्या आव्हानांना तोंड देण्यासाठी या क्षेत्रात येणाऱ्यांना आधुनिक व्यवस्थापन प्रशिक्षण उपयुक्त ठरेल, असे मत एनएमआयएमएसच्या स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटचे अधिष्ठाता प्रशांत मिश्रा यांनी व्यक्त केले आहे.
बांधकाम व्यवसायात आलेल्या नवीन संकल्पना, रेरा कायदे, अत्याधुनिक तंत्रज्ञान, बांधकामाची आधुनिक साधने, आरईआयटीसारखी आर्थिक साधने यांचे ज्ञान देऊन या क्षेत्रातून नेतृत्व करणारे व्यवस्थापक घडवण्यासाठी एनएमआयएमएस स्कूल ऑफ बिझनेस मॅनेजमेंटमध्ये रियल इस्टेट मॅनेजमेंटचे एमबीए प्रशिक्षण दिले जाते. त्या अभ्यासक्रमास सुरुवात होत असल्याच्या निमित्ताने मिश्रा यांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
या क्षेत्रातील ज्येष्ठ व्यावसायिकांच्या सहकार्याने हा अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना आजच्या काळाला साजेसे असे प्रशिक्षण मिळते. यात बांधकाम व्यवसायातील अर्थकारण, प्रत्यक्ष काम, मार्केटिंग धोरणे, सिव्हिल-मेकॅनिकल-इलेक्ट्रिकल आणि इतर व्यवस्थापन तसेच अभियांत्रिकी यांचे शिक्षण मिळते. उद्योग क्षेत्रातील तज्ञांची तसेच शिक्षणतज्ञांची व्याख्याने हा महत्त्वाचा भाग या अभ्यासक्रमात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानात मूल्य भर पडते अशी माहिती मिश्रा यांनी दिली. कोरोना नंतरच्या कालखंडात रिअल इस्टेट क्षेत्र अनेक आव्हानांना तोंड देते आहे. या वातावरणातून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांना दोन महिन्याची इंटर्नशिपदेखील दिली जाते. यातून तसेच विविध स्टडी टूरमधून त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळतो, असेही ते म्हणाले.