वाहनचालकांचा प्रवास पदपथावरून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहनचालकांचा प्रवास पदपथावरून
वाहनचालकांचा प्रवास पदपथावरून

वाहनचालकांचा प्रवास पदपथावरून

sakal_logo
By

जुईनगर, ता. १९ (बातमीदार)ः येथील चौकांचे काँक्रीटीकरणाचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू आहे. त्यासाठी शिरवणेकडे ये-जा करणारा मार्ग बंद करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनचालकांना वळसा मारून राजीव गांधी उड्डाणपुलाचा वापर करावा लागत असल्याने वर्दळ असणाऱ्या पदपथांवरूनच दुचाकीचा प्रवास सुरू असल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.
जुईनगरमधील रस्त्याचे अनेक दिवसांपासून खोदकाम सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. तसेच जुईनगर, सेक्टर २५ मधील हा रस्ता शिरवणे गावाकडे जाण्यासाठी जोडलेला आहे. बाजूलाच स्वयंभू श्री गणेश मंदिर आहे, शिरवणे विद्यालय, पालिकेची शाळा आणि खासगी शाळा मोठ्या प्रमाणावर असून मार्केटदेखील काही अंतरावर आहे. त्यामुळे नेहमीच नागरिकांची वर्दळ असलेल्या या रस्त्यावर अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कामामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेष म्हणजे, सानपाडा, नेरूळ आणि शिरवणे विभागाला जोडणाऱ्या या रस्त्यावरील पदपथांवरून वाहनचालक चक्क दुचाकी चालवत असल्यामुळे चालायचे कसे, असा प्रश्न पादचाऱ्यांपुढे निर्माण झाला आहे.
-------------------------------------
नियोजनशून्य कारभार
जुईनगर, सेक्टर २५ मधील चिंचोळी तलावाच्या बाजूला सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्यात या रस्त्यावरून शिरवणे तसेच आजूबाजूच्या परिसरातून येणाऱ्या नागरिकांची नेहमीच ये-जा सुरू असते. त्यामुळे शाळा कॉलेज, मार्केट असल्यामुळे नेहमीच वर्दळ असलेल्या या भागात पदपथांवरून चालणाऱ्याच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पालिकेच्या नियोजन शून्य कारभारावर रहिवाशांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
-------------------------------
शॉर्टकट बेतणार जिवावर
शिरवणे, नेरूळ आणि जुईनगर या परिसराला जोडणाऱ्या चिंचोली तलाव येथील चौकाच्या कॉँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी शिरवणे येथील भुयारी मार्गातून होणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. या मार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. रस्ता बंद असल्याने वाहनचालकांना राजीव गांधी उड्डाणपुलावरून वळसा मारावा लागत आहे. शॉर्टकट मारण्यासाठी दुचाकीस्वार चक्क पदपथावरून वाहनांची ने-आण करत असल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे.