जनसायकलच्या वापरात नवी मुंबईकर आघाडीवर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जनसायकलच्या वापरात नवी मुंबईकर आघाडीवर
जनसायकलच्या वापरात नवी मुंबईकर आघाडीवर

जनसायकलच्या वापरात नवी मुंबईकर आघाडीवर

sakal_logo
By

वाशी, ता. १९ (बातमीदार)ः जनसायकल प्रणालीच्या माध्यमातून सायकलचा देशात सर्वाधिक वापर करणारे नवी मुंबई हे शहर ठरले आहे. नवी मुंबई शहरात आत्तापर्यंत जनसायकल प्रणालीच्या माध्यमातून नवी मुंबईकरांनी ४९ लाख २१ हजार किलोमीटरचा प्रवास केला असून ४ लाख ८८ हजार ५८२ नवी मुंबईकरांनी ऑनलाईन नोंदणी केलेली आहे.
नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक शहराची संकल्पना राबवण्याच्या दृष्टीने जनसायकल प्रणाली व इलेक्ट्रिक बाईक प्रणाली १ नोव्हेंबर २०१८ पासून ‘युलू बाईक प्रायव्हेट लिमिटेड’च्या माध्यमातून सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील नागरिकांना दळणवळणाच्या जास्तीत जास्त चांगल्या सुविधा देण्याबरोबरच शारीरिक तंदुरुस्तीच्या दृष्टीने हा उपक्रम राबवण्यात आला आहे. या सुविधेला नवी मुंबईकरांचा भरघोस प्रतिसाद मिळाला असून शहरात ई-बाईकलाही चांगला प्रतिसाद मिळत आहे. सद्यस्थितीत शहरातील बेलापूर-वाशी या परिमंडळ १ क्षेत्रातच २२ ठिकाणी ही सेवा सुरू होती. परंतु, ऐरोलीचे तत्कालीन आमदार संदीप नाईक यांच्या पाठपुराव्यानंतर या प्रणालीचा प्रारंभ कोपरखैरणे निसर्ग उद्यान तसेच ऐरोली सेक्टर १५ येथील जॉगिंग ट्रॅकपर्यंत करण्यात आला आहे.
---------------------------------------------
पालिका क्षेत्रात ९६ ठिकाणी सुविधा
आत्तापर्यंत सायकल प्रणालीतून ४९ लाख २१ हजार किलोमीटरच्या फेऱ्या करण्यात आल्या आहेत; तर दुसरीकडे इंधनावरील दुचाकी व त्यामुळे होणारे प्रदूषणदेखील कमी झाले आहे. त्यामुळे पालिकेला या सुविधेच्या माध्यमातून ४९ कोटी ६९ लाख ५ हजार ५६९ ग्रॅम कार्बन क्रेडिट प्राप्त होणार असल्याचा विश्वास आहे. सद्यस्थितीत पालिका क्षेत्रात ९६ ठिकाणी सायकल स्टॅण्डसाठी जागा उपलब्ध करून देण्यात आले असून नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी अशा प्रकल्पांमुळे हातभार लागला आहे.
----------------------------------------
नवी मुंबई शहर हे जनसायकलचा सर्वात जास्त वापर करणारे देशातील पहिले शहर आहे. नवी मुंबईकरांच्या प्रतिसादामुळे पर्यावरणपूरक कामासाठी प्रोत्साहन मिळत असून यासाठीच पामबीच मार्गावर सायकल ट्रॅकची निर्मिती करण्यात येत आहे.
- राजेश नार्वेकर, आयुक्त, नवी मुंबई महापालिका