मालमत्ता हस्तांतरण महागले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मालमत्ता हस्तांतरण महागले
मालमत्ता हस्तांतरण महागले

मालमत्ता हस्तांतरण महागले

sakal_logo
By

भाईंदर, ता. २० (बातमीदार) : मालमत्तेची खरेदी विक्री झाल्यानंतर संबंधित मालमत्तेवर असलेला मालमत्ता कर हस्तांतर करण्याच्या शुल्कात मिरा-भाईंदर महानगरपालिकेने वाढ केली आहे. याआधी कर हस्तांतरणासाठी किमान एक हजार रुपये शुल्क घेण्यात होते आता हे शुल्क किमान अडीच हजार रुपये एवढे करण्यात आले आहे. या वाढीव शुल्काची प्रशासनाने १० फेब्रुवारीपासून अंमलबजावणी सुरु केली आहे.
मिरा-भाईंदर शहरामधील मालमत्ता हस्तांतरण शुल्कामध्ये गेल्या काही वर्षात वाढ झालेली नव्हती. सध्या मिरा-भाईंदरमधील मालमत्तांचे भाव गगनाला भिडले आहेत. त्या तुलनेत कर हस्तांतरण शुल्क नगण्यच होते. शहरातील मालमत्तांचे किमान मुल्य पन्नास ते साठ लाख रुपयांच्या घरात गेलेले असताना कर हस्तांतरणासाठी केवळ एक हजार रुपये शुल्क आकारले जात असल्यामुळे आयुक्त दिलीप ढोले यांनी या शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला. आता ३०० चौ. फूट क्षेत्रफळापर्यंतच्या निवासी मालमत्तेसाठी कर हस्तांतरण शुल्क २५०० रुपये तर व्यावसायिक मालमत्तेसाठी ४००० रुपये, ३०१ ते ६०० चौ.फूटापर्यंतच्या निवासी मालमत्तेसाठी ३५०० रुपये व व्यावसायिक मालमत्तेसाठी ७००० रुपये, ६०१ ते १००० चौ.फूटापर्यंतच्या निवासी मालमत्तेसाठी ५००० रुपये तर व्यावसायिक मालमत्तेसाठी १५००० व १००१ चौ. फूटावरील सर्व निवासी मालमत्तांना १०००० रुपये व व्यावसायिक मालमत्तांसाठी २०००० रुपये शुल्क आकारले जाणार आहे. वारसा हक्क व एकाच कुटुंबातील अंतर्गत हस्तांतरणासाठी मात्र १००० रुपये शुल्क घेण्यात येणार आहे.

झोपड्यांच्या कर हस्तांतरणासाठी शुल्क निश्चित
सरकारी जागांवर वसलेल्या झोपड्यांच्या कर हस्तांतरणावर महापालिकेकडून कित्येक वर्षे बंदी घालण्यात आली होती. झोपड्यांना आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला होता. पण झोपडपट्ट्यांमधील खरेदी विक्रीवर मात्र या निर्णयाचा कोणताही परिणाम झाला नाही. उलट महापालिकेतील कर्मचाऱ्‍यांना हाताशी धरुन झोपड्यांचे कर बेकायदेशीरपणे हस्तांतर करण्याचे काम सुरुच होते. यात महापालिकेचे आर्थिक नुकसान होत होते. त्यामुळे झोपड्यांच्या कर हस्तांतरणाला पुन्हा सुरुवात करण्याचा निर्णय प्रशासनाने याआधी घेतला होता. आता या हस्तांतरणासाठीचे शुल्क निश्चित करण्यात आले आहे. त्यानुसार झोपड्यांचा कर हस्तांतर करण्यासाठी आता २००० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.