
नियुक्तीपूर्व प्रशिक्षणाचे विद्यावेतन वाढवावे
सकाळ वृत्तसेवा
मुंबई, ता. १९ : एसटी महामंडळाच्या महिला कर्मचाऱ्यांचे वर्ष २०१९ मध्ये एक वर्षाचे प्रशिक्षण सुरू आहे. त्यानंतर ८० दिवसांचे नियुक्तीपूर्व प्रशिक्षण दिले जाते. या दोन्ही प्रशिक्षणासाठी मोजकेच विद्यावेतन दिले जाते. प्रशिक्षणार्थी असलेल्या भावी कर्मचाऱ्यांचे दैनंदिन गरजासुद्धा भागत नाही. परिणामी स्वतःचा पैसा खर्च करून प्रशिक्षण पूर्ण करण्याची वेळ महिला कर्मचाऱ्यांवर आली आहे. यापूर्वी प्रशिक्षणार्थींना एक वर्षाच्या प्रशिक्षणासाठी मिळणारे १५० रुपयांचे विद्यावेतन ५०० रुपये केले, त्याप्रमाणेच ८० दिवसांच्या प्रशिक्षणाचे विद्यावेतनातसुद्धा वाढ करण्याची मागणी करण्यात आली आहे.
तुटपुंज्या विद्या वेतनात एसटीत भविष्यात चालक तथा वाहक म्हणून नियुक्त होणाऱ्या प्रशिक्षण घेणाऱ्या महिला उमेदवारांची बोळवण केली जात आहे. यासंदर्भात ‘सकाळ’ने वृत्त प्रकाशित केल्यानंतर आता प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांनी पुढे येऊन विद्यावेतनवाढीची मागणी एसटी प्रशासनाकडे लाऊन धरली आहे. या मागणीसाठी राज्य एसटी कामगार संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांसह प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांनी एसटीच्या कर्मचारीवर्ग व औद्योगिक संबंध विभागाच्या महाव्यवस्थापकांना निवेदन देत विद्यावेतन वाढवण्याची मागणी केली. या वेळी महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेचे सरचिटणीस हनुमंत ताटे, राज्य महिला संघटक सचिव शीला नाईकवाडे, वैशाली तायडे, सुषमा इंगळे, कीर्ती बोंदरे आणि मुक्ता जाधव यांनी महिला चालकांच्या प्रश्नावर कर्मचारी वर्ग व औद्योगिक संबंध विभागाचे महाव्यवस्थापक गायकवाड यांच्यासमोर व्यथा मांडली. एसटी प्रशासनामार्फत समाधानकारक तोडगा काढण्याचे सर्व प्रयत्न केले जाणार असल्याचे गायकवाड यांनी आश्वासन दिल्याचे शीला नाईकवाडे यांनी सांगितले.